अमरावतीने पटकावले अजिंक्यपद
By Admin | Updated: December 29, 2014 23:49 IST2014-12-29T23:11:49+5:302014-12-29T23:49:10+5:30
राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा: जळगाव उपविजेता, मुंबई तिसरे

अमरावतीने पटकावले अजिंक्यपद
सांगरुळ (जि. कोल्हापूर): सांगरुळ हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद ३१ व्या सबज्युनिअर मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत अमरावतीच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. उपविजेताचा मानकरी जळगावचा संघ ठरला, तर मुंबईला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अमरावती संघातील मुलींनी केलेल्या आक्रमक खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील सांगरुळ हायस्कूलच्या मैदानावर गेले तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती. यामध्ये राज्यातील १७ संघांनी सहभाग घेतला होता. यजमान कोल्हापूर संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली; पण जळगावने यजमान संघाला रोखत उपांत्यफेरीत धडक दिली. अजिंक्यपदासाठी अमरावती व जळगावच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे दर्शन घडवले.
खेळाच्या दुसऱ्या मिनिटालाच जळगावच्या मोनाली अंजीरने सलग दोन गुण घेत सामन्यावर पकड घट्ट केली. त्यानंतर अमरावतीच्या खेळाडूंनीही सातव्या मिनिटांत सामन्यावर पकड घेत सलग पाच गुण नोंदवले. शेवटपर्यंत झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात अमरावतीने १३ विरुद्ध ११ गोलने अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
तिसऱ्या क्रमांकासाठी मुंबई व नाशिक यांच्यात सामना रंगला. यामध्ये मुंबईने बाजी मारली. (प्रतिनिधी)
क्रीडाशौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय मुलींची हँडबॉल स्पर्धा झाल्याने क्रीडाशौकिनांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. यजमान कोल्हापूर संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाल्याने क्रीडारसिकांच्या उत्साहावर पाणी पडले.