पालकमंत्र्यांनी स्वीकारावे पुनर्वसित गावाचे पालकत्व! निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांची मागणी
By प्रदीप भाकरे | Updated: February 22, 2025 20:44 IST2025-02-22T20:44:23+5:302025-02-22T20:44:39+5:30
Amravati News: अप्पर वर्धा प्रकल्पानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या ठरू पाहणाऱ्या निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित असली तरी ती रखडलेल्या स्थलांतरणामुळे होणार की नाही, अशी शंका असताना सुसज्ज मूलभूत सुविधांसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे.

पालकमंत्र्यांनी स्वीकारावे पुनर्वसित गावाचे पालकत्व! निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांची मागणी
अमरावती - अप्पर वर्धा प्रकल्पानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या ठरू पाहणाऱ्या निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित असली तरी ती रखडलेल्या स्थलांतरणामुळे होणार की नाही, अशी शंका असताना सुसज्ज मूलभूत सुविधांसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंचन भवनात भेट घेतली. तथा पिण्याचे पाणी व पुनर्वसनस्थळी मूलभूत सुसज्ज सुुविधा पुरविल्यानंतरच स्थलांतरण, अशी मागणी रेटून धरली. पालकमंत्र्यांनी अळणगाव या पुनर्वसित गावाचे पालकत्व स्वीकारावे, अशी आर्त हाकही दिली.
निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत अळणगाव या गावाचे पुनर्वसन अमरावतीलगतच्या कठोरा शिवारात करण्यात आले. मात्र या प्रकल्पाला जुन्या कायद्यानुसार मूलभूत सुविधा देय असल्याने प्रकल्पग्रस्तांची मानसिकता नकारात्मक होत चालली आहे. येथे बाभूळबन निर्माण झाले असून, पिण्याचे पाणीदेखील नाही. नाल्या बुजल्या आहेत. काही इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे आपण या गावाचे पालकत्व स्वीकारून या पुनर्वसित गावात विकासात्मक कामे करावीत व हे गाव राज्यभरातील पुनर्वसितांसाठी मॉडेल म्हणून उभे राहावे, अशी विनंती प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आ. रवी राणा यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी सरपंच गौतम खंडारे, सतीश मेटांगे, पंजाबराव दुर्गे, प्रवीण घोंगडे आदी उपस्थित होते.
पाच गावे बुडीत क्षेत्रात
निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत हातुर्णा, अळणगाव, गोपगव्हाण, कुंड खुर्द व कुंड सुर्जापूर ही पाच गावे पूर्णत: बुडीत क्षेत्रात आहे. त्यांचे पाच ठिकाणी पुनर्वसनासाठी जागादेखील देण्यात आली आहे. मात्र त्या पुनर्वसित पाचही गावांत मूलभूत सुविधांची वानवा असल्याने अद्यापपर्यंत पाचही गावातील सुमारे ४० टक्के कुटुंबांनी गावे सोडलेले नाही. त्यांचे स्थलांतरण अडल्याने परिणामी प्रकल्पाची घळभरणीदेखील थांबली आहे.
अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
१) निम्न पेढी प्रकल्पातील एकूण १७६२ बाधित कुटुंबांना ८.२६ लाख रुपये प्रतिकुटुंब सानुग्रह अनुदान द्यावे.
२) निम्न पेढी प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबाला सरसकट घरकुलाच्या लाभ देण्यात यावा, कुणालीही अपात्र ठरवू नये.
३) निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसन ज्या ठिकाणी मिळालेल्या भूखंडावरील ७/१२ बोझा हटवून कमी करून देण्यात यावा.
४) निम्न पेढी प्रकल्पातील ५२ शेतकऱ्यांना २ चा गुणक लागू करून फरकाची रक्कम देण्यात यावी.५) निम्न पेढी प्रकल्पातील पाचही गावांचे जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
पुनर्वसन हवे दर्जेदार
निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसित गावात पेयजलाची व्यवस्था करावी. अंतर्गत रोडचे डांबरीकरण व बंधिस्त नालीचे बांधकाम, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसह नवीन इमारत बांधकाम करणे, खुले मात्र सरकारी भूखंडांना वॉल कंपाऊंड घालून तेथील स्वच्छता व सौंदर्यीकरण करणे, इलेक्ट्रिक पोलची दुरुस्ती करणे, स्ट्रीट लाइट बसवणे, डी. पी. दुरुस्तीची मागणीदेखील करण्यात आली.