लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शुक्रवार व शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करावी लागली. मात्र, त्यानंतरही दोन समुदाय आमनेसामने उभे ठाकल्याचे दृश्य दिसले. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून हिंदू मुस्लिमबहुल परिसरात ‘मिशन कॉर्नर मीटिंग्ज’ राबविण्यात आले. हेल्पलाईनदेखील मदतीला धावली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. ‘कॉर्नर मीटिंग्ज’मधील परिणामकारक समुपदेशन व मार्गदर्शनामुळे शहरातील ‘टेन्स’ हळूहळू नाहीसा होऊन शहर पूर्वपदावर येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शहरातील जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी ‘मिशन सर्वधर्म समभाव‘ हाती घेतले. त्याअंतर्गत शहरातील अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात कॉर्नर मीटिंग्ज घेतल्या जात आहेत. त्या छोटेखानी बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातील दोन्ही समुदायातील उपस्थितांच्या संख्येने त्यावरील यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले आहे. पोलीस आयुक्तांसह उपायुक्त विक्रम साळी व एम.एम. मकानदार तथा सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी ज्या भागात हिंसाचार झाला, अशा भागात रात्रीच्या वेळी छोटेखानी सभा घेत आहेत. हनुमाननगर परिसरात दोन समुदाय आमनेसामने ठाकले होते. त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली. त्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांची एकत्रित उपस्थिती शहर शांततेकडे वाटचाल करीत असल्याची नांदी ठरली आहे. यात हेल्पलाईनची मदत मिळत आहे.
घराच्या आत राहा, अन्यथा फौजदारीचा बडगाअनेक ठिकाणी ‘ठोशास ठोसा’ म्हणून लोक आमनसामने आले. संचारबंदीच्या काळात कोणत्याही समुदायाने, जमावाने अमोरासमोर उभे ठाकू नये, घरातच राहावे, अन्यथा फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा तंबी वजा इशारादेखील बैठकांमधून खाकीकडून दिली जात आहे. तेवढ्याच प्राधान्याने तरुणाईला दंगल, त्यानंतर दाखल गुन्ह्यांची माहितीदेखील दिली जात आहे.