अमरावतीकरांनो, सावधान !
By Admin | Updated: November 7, 2015 00:06 IST2015-11-07T00:06:33+5:302015-11-07T00:06:33+5:30
१८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत.

अमरावतीकरांनो, सावधान !
दीड वर्षात ७७ कोटींनी फसवणूक : सहा कंपन्यांविरुद्ध १५४९ तक्रारी
लोकमत विशेष
अमरावती : १८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत. मागील दीड वर्षांत तब्बल ७७ कोटी रूपयांनी त्यांचा खिसा कापला गेला. श्रीसूर्या, सात्विक इन्व्हेस्टमेंट, बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह, राणा लँडमार्क, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि चित्रांश टेक्नॉलॉजी या सहा कंपन्यांनी अमरावतीकरांना कोट्यवधी रूपयांनी गंडविले आहे.
या ६ कंपन्यांविरोधात शहरातील ५ पोलीस ठाण्यांत तब्बल १,५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली असली तरी लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची कोट्यवधींची रक्कम परत मिळाली नाही.
बीएचआर मल्टिस्टेट वगळता कोणत्याही खासगी वित्तीय संस्थांवर प्रशासक नसल्याने गुंतविलेली रक्कम परत मिळेलच, याबाबत शाश्वती नाही.
या प्रकरणांत आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे प्रलोभन देत एजंट, दलाल, असोशिएटसची साखळी तयार केली. एजंटस्ना बनवेगिरीच्या या व्यवसायातून कोट्यवधींची बिदागी मिळाल्याने त्यांनी लोकांना अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अधिक परतावा मिळत असल्याने लोक बळी पडले.