राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावतीला ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: March 19, 2016 00:04 IST2016-03-19T00:04:46+5:302016-03-19T00:04:46+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण भागाला भरभरून न्याय दिला आहे.

Amravati 'good days' in the state budget | राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावतीला ‘अच्छे दिन’

राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावतीला ‘अच्छे दिन’

‘एचव्हीपीएम’ला एक कोटी : रेमण्ड कारखाना, वरुड येथे संत्रा प्रक्रिया
अमरावती : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण भागाला भरभरून न्याय दिला आहे. 'कृषिपूरक अर्थसंकल्प' असे या बजेटचे स्वरूप आहे. विशेष बाब म्हणजे अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यावर नव्या योजनांचा वर्षाव करण्यात आल्याने बजेटच्या माध्यमातून अमरावतीसाठी ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शताब्दीवर्षानिमित्त मंडळाला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. अमरावतीत जलसाक्षरता व जलजागृती कक्षाची स्थापना, यशदाचे कायमस्वरुपी उपकेंद्र देखील अमरावतीत स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन देण्याच्या योजनेत अमरावती विभागाचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याकरिता एक हजार ३२ कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे.
वरुड येथे संत्राप्रक्रिया उद्योग, नांदगाव पेठ येथील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत रेमण्ड कारखाना, शेतकरी कर्जसवलतीत अमरावती जिल्ह्याचा समावेश, अमरावतीत उद्योग उभारल्यास वीज दरात सवलत, वस्त्रोद्योगात सूट देण्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली असून यात सुध्दा अमरावतीचा समावेश राहणार आहे. कृषी संशोधन केंद्र तसेच पशू वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत साकारण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली.
गोवर्धन गोवंश संरक्षण योजनेसाठी एक कोटींची तरतूद असून या योजनेचा लाभ अमरावतीकरांना मिळणार आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी २६५ कोटी रुपयांची तरतूद असून याचा लाभदेखील अमरावती विभागाला मिळेल. मेळघाटातील संपूर्ण बांबूकेंद्रात तयार होणारे साहित्य, वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. शेतकरी नुकसान भरपाईसाठी २ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी एक हजार कोटी तर विद्युतपंप जोडणीसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. दुष्काळ, नापिकीच्या पार्श्वभूमिवर सादर झालेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सध्याचे चित्र आहे. विदर्भ, मराठवाड्याला प्राधान्य दिल्याचे जाणवते. अमरावती जिल्ह्यात रोजगार आणि शेतकरी केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.

Web Title: Amravati 'good days' in the state budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.