अमरावती एक्स्प्रेसला दरदिवशी सहा लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: April 20, 2015 00:23 IST2015-04-20T00:23:19+5:302015-04-20T00:23:19+5:30
अमरावतीकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस गाडीला चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडला आहे.

अमरावती एक्स्प्रेसला दरदिवशी सहा लाखांचे उत्पन्न
डबेवाढीचा प्रस्ताव बारगळला : प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढली
अमरावती : अमरावतीकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस गाडीला चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडला आहे. दरदिवसाला सहा लाखांचे उत्पन्न देणाऱ्या या गाडीच्या सोयीसुविधांकडे लोकप्रतिनिधींनी कमालीचे दुर्लक्ष चालविले आहे.
७ सप्टेंबर २००८ पासून सुरु झालेली मुंबई एक्सप्रेस आजतायगत हाऊसफुल्ल धावत आहे. विशेषत: उन्हाळ्यात प्रतीक्षा यादीचे आरक्षण घेऊन या गाडीने प्रवास करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे उन्हाळ्यात दुप्पट रक्कम देणारी ही गाडी ठरत असल्याची नोंद रेल्वे विभागात आहे. प्रवाशांची गर्दी बघता मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करावी, याबाबतचा प्रस्ताव खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेकडे दिला होता. परंतु या प्रस्तावावर रेल्वेने गांभीर्याने विचार केला नसल्याने वास्तव आहे. हल्ली ही गाडी १८ डब्यांची धावत असून याशिवाय चार डब्यांची अतिरिक्त मागणी फारपूर्वीची आहे. विदर्भ एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई एक्स्प्रेसला जास्त मागणी असताना डब्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव का धूळ खात पडला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. दरवर्षी उन्हाळा अथवा लग्न प्रसंगाचा मौसम सुरु झाला की मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सातत्त्याने डब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी सुरु असून लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे प्लॅटफार्मवर अपुऱ्या सुविधांमुळे नवीन गाड्या सुरु करणे किंवा अस्तित्वात असलेल्या गाड्यांच्या डब्यात वाढ करणे शक्य नाही, हीदेखील नवीन माहिती हाती आली आहे.