अनुदानाची रक्कम खर्च; विकासकामे कशी होणार ?
By Admin | Updated: August 11, 2015 00:31 IST2015-08-11T00:31:01+5:302015-08-11T00:31:01+5:30
महापालिकेत १३ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाची रक्कम वेतनावर खर्च करण्यात आली आहे.

अनुदानाची रक्कम खर्च; विकासकामे कशी होणार ?
दिगंबर डहाके यांचा सवाल : रमाई घरकुलाचा निधी वळता केल्याचा आरोप
अमरावती : महापालिकेत १३ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाची रक्कम वेतनावर खर्च करण्यात आली आहे. आता ही रक्कम तिजोरीत नसताना विकासकामे कशी करणार, असा सवाल माजी विरोधी पक्षनेता दिगंबर डहाके यांनी सोमवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला. डहाके यांंनी आयुक्तांच्या एककल्ली कारभारवर ताशेरेदेखील ओढले.
डहाके यांच्या माहितीनुसार, आयुक्त चंद्र्रकांत गुडेवार यांनी केवळ घर मोजणी, नियमबाह्य बांधकाम तपासणी याकडेच लक्ष वेधले आहे. मात्र शहरात विकास कामे ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. मोठा गाजावाजा करुन राजापेठ रेल्वे क्रासींगवर उड्डाणपूल निर्मिती करण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु उड्डाणपुलासाठी प्राप्त अनुदान हे नगरोत्थान विकास कामांसाठी लोकवर्गकरिता देण्यात आले आहे. अनुदान, निधी असल्याचे हे केवळ कागदावरच असल्याचा आरोप डहाके यांनी केला आहे. तसेच रमाई घरकूल योजनेचे प्राप्त १० कोटी रुपयांचे अनुदान हे मुदत ठेव करण्यात आली. ही रक्कमदेखील बॅकेतून काढली आहे. रमाई घरकूल योजनेची रक्कम दुसरीकडे वळती करता येत नसताना ती आयुक्त गुडेवार यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी वळती केली, असा दावा त्यांनी केला. राजापेठ येथे प्रस्तावित उड्डाणपूल निर्मितीसाठी तिजोरीत पैसे नसताना स्थायी समितीत मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावावर आपण आक्षेप नोंदविणार, असे त्यांनी सांगितले. सहापट कर आकारणीला कायम विरोध राहील. सभागृहाने दुप्पट कर आकारणीचा घेतलेला निर्णय योग्य असून नागरिकांची लुबाडणूक होऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा डहाके यांनी दिला. महापालिका आर्थिक डबाघाईस आली असून शहरातील दोन्ही आमदारांनी विशेष अनुदान शासनाकडून खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)