अंबानगरीत गुटखा विक्री जोरात!
By Admin | Updated: January 9, 2017 00:13 IST2017-01-09T00:13:27+5:302017-01-09T00:13:27+5:30
अंबानगरीत गुटखा विक्री जोरात सुरू आहे. याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

अंबानगरीत गुटखा विक्री जोरात!
अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष : पोलिसांनीही घ्यावा पुढाकार
अमरावती : अंबानगरीत गुटखा विक्री जोरात सुरू आहे. याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. राज्यात गुटखाबंदी असताना अमरावतीत खुलेआम गुटखा विक्री कशी काय करण्यात येते, हा प्रश्न येथील जनतेला नेहमीच पडतो. मात्र याकडे खूद अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच कानाडोळा करण्यात येत आहे.
शहरात व ग्रामीण भागात हजारो पाणटपऱ्या आहेत. पाणटपरीवर सहज तंबाखूजन्य खर्रा व गुटखा पुड्या उपलब्ध होतात. त्यामुळे गुटखाबंदी असतानाही या पाणटपरींवर कसा काय गुटखा मिळतो, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरात ७०० ते ८०० पाणटपरी आहेत. जिल्ह्यात हजारो पाणटपरी आहेत. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या गुटखा पुड्या सर्रास विक्री करण्यात येते. नागपुरी खर्ऱ्यापासून तर पट्टा राजरत्नपर्यंत अनेक तंबाखूजन्य खर्ऱ्याची विक्री मोठ्याप्रमाणात होत आहे. मध्यप्रदेशाच्या सीमारेषांवरून हा गुटखा राज्यात येत असल्याची माहिती आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी शहरात मोठ्याप्रमाणात गुटख्याचा साठा जिल्हाधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची ईनकॅमेरा होळीसुध्दा करण्यात आली होती. त्यामुळे गुटख्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे काही दिवस शहरात गुटखा विक्रेत्यांवर अंकुश बसले होते. पण अन्न प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करून, पुन्हा कारवाया मंदावल्या आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा गुटखा विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा गुटखा शहरात येतो. त्याची विक्री करण्यात येते. या कारणाने तरुणवर्ग व्यसनाधीन होत आहे. यामुळे विविध आजाराला आमंत्रण मिळत आहे. सुगंधी तंबाखूयुक्त गुटखा खालल्यामुळे कर्करोगासारखे आजारही होत आहेत. परंतू निष्क्रिय झालेले अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई का करीत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
महसूल विभागाने करावी कारवाई
गुटख्याची तस्करी व वाहतूक होत असेल तर पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता. परंतु त्यातही गौडबंगाल होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कारवाईचा असलेला अधिकार काढण्यात आला. त्यामुळे अवैध गुटखा विक्रीवर कुणीच कारवाई करीत नसल्याने सर्रास गुटखा विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे आता महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बनावट गुटख्याच्या पुड्या शहरात दाखल
गुटखाबंदी होण्यापूर्वी अधिकृत नोंदणीकृत कंपनीचाच गुटखा पुड्या विक्रीस येत होत्या. त्यामुळे काही प्रमाण अन्न व प्रशासन विभागाचे त्यांच्यावर नियंत्रण होते. पण आता गुटखाबंदीच असल्याने कुठल्याही गुटख्याच्या पुड्या विकणे ह्या अन्न सुरक्षा मानदे कायद्याने गुन्हा आहे. पण सर्रास गुटखा विक्री होत असून गुटखा विक्रीसच्या व्यवसायात काही बनावट कंपन्याही उतरल्या असून बनावट गुटखा बाजारपेठेत विक्रीला आला आहे. तो गुटखा खालल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून तो शरीराला अतिशय हानीकारक आहे. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.