घरफोडीनंतर दुचाकीही चोरायचा अमित केने
By Admin | Updated: March 30, 2017 00:11 IST2017-03-30T00:10:20+5:302017-03-30T00:11:18+5:30
सराईत घरफोड्या अमित केनेला अखेर कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी यशोदानगरातून अटक केली. अमित केने दीड वर्षांपासून फरार होता.

घरफोडीनंतर दुचाकीही चोरायचा अमित केने
आरोपीला अटक : २२ घरफोड्यांची कबुली, दुचाकी जप्त, ३१ पकड वॉरंट
अमरावती : सराईत घरफोड्या अमित केनेला अखेर कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी यशोदानगरातून अटक केली. अमित केने दीड वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरूद्ध आतापर्यंत ३१ पकड वाँरट निघाले असून तो घरफोड्या करण्यात पारंगत आहे. तो घरफोडी केल्यानंतर तेथूनच दुचाकी चोरून पसार व्हायचा. अमित केनेने आतापर्यंत २२ घरफोड्यांची कबुली दिली असून या चोऱ्यांमध्ये त्याने तब्बल २० लाखांपर्यंत ऐवज, रोख पळविल्याची माहिती पोलीससूत्रांनी दिली.
चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीत तरबेज आरोपी अमित हा दीड वर्षांपूर्वी कारागृहातून जामीनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने घरफोड्यांचे सत्र सुरुच ठेवले होते. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी घरफोडी, चोरी व दुचाकी चोरीच्या घटना उघड झाल्या. त्याअनुषंगाने पोलीस अमित केनेच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अमित केनेला पकडण्यासाठी आतापर्यंत ३१ वेळा अटक वॉरंट निघाले असून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अमित केने हा कुख्यात चोरटा पंकज गोंडाणेचा मित्र असून दोघेही घरफोडी व चोऱ्या करीत होते. दोन दिवसांपूर्वीच साईनगर व गाडगेनगर परिसरातील चोरीप्रकरणात अमितचा सहभाग असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. बुधवारी गुप्त माहितीवरून कोतवालीच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, सागर ठाकरे, विनोद भगत यांनी सापळा रचून अमितला यशोदानगरातून अटक केली. त्याने राजापेठ, कोतवाली, नागपूरी गेट, बडनेरा, गाडगेनगर यापोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ घरफोड्यांची कबुली दिली. पोलिसांनी अमितला घटनास्थळी नेऊन शहानिशा केली आहे. अमितचे तडीपारीचे आदेश निघाले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. अनेक घरफोड्या उघडकीस येऊ शकतात. (प्रतिनिधी)
सराफा व्यावसायिक टार्गेट
अमित केने हा घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने काही सोनार व्यावसायिकांकडे विकायचा. सद्य:स्थिस्तीत ‘त्या’ सोनारांची नावे निष्पन्न झाली नाहीत. त्यांची नावे माहिती होताच त्या ज्वेलर्स संचालकाची चौकशी सुरु केली जाणार आहे. त्यांनाही ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गाडगेनगर, साईनगर परिसरात चोरी
दोन दिवसांपूर्वीच अमित केने याने साईनगर व गाडगेनगर परिसरात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. गाडगेनगरच्या हद्दीतील रहिवासी वानखडे कुटुंबीय पुणे येथे गेले असता अमित केने याने त्यांच्या घराला लक्ष्य करून मुद्देमाल लंपास केला. त्याचप्रमाणे साईनगर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.