इर्विन चौकातील आंबेडकर स्मारकाच्या जागेची मोजणी
By Admin | Updated: January 12, 2016 00:25 IST2016-01-12T00:25:09+5:302016-01-12T00:25:09+5:30
स्थानिक इर्विन चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरालगत साकारल्या जात असलेल्या स्मारकाच्या जागेसाठी सोमवारी मोजणी करण्यात आली.

इर्विन चौकातील आंबेडकर स्मारकाच्या जागेची मोजणी
पाच हजार स्क्वेअर फूट : महापालिका, भूमिअभिलेख विभागाची कार्यवाही
अमरावती : स्थानिक इर्विन चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरालगत साकारल्या जात असलेल्या स्मारकाच्या जागेसाठी सोमवारी मोजणी करण्यात आली. ही मोजणी महापालिका सहायक संचालक नगर रचना विभाग, भूमिअभिलेख विभागाने संयुक्तपणे केली आहे.
महापालिका आमसभेत झालेल्या ठरावानुसार स्थानिक इर्विंन चौकात पाच हजार चौरस स्क्वेअर फूट जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये अपेक्षित आहे. मुळात ही जागा गट्टाणी नामक यांची असून ते नाशिक येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी जागेची मोजणी झाली असता ते हजर नव्हते. मात्र गट्टाणी यांनी आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा देण्यास समर्थता दर्शविली आहे. स्मारकासाठी जी जागा संपादन करावयाची आहे त्या जागेची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे जागा निरिक्षक गायकवाड, महापालिकेचे जागा निरिक्षक गणेश कुत्तरमारे, प्रितम रामटेके, कंकाळे आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रदीप दंदे, भूषण बनसोड हे देखील हजर होते. जागा मोजणीचा अहवाल भूमिअभिलेख विभाग लवकरच महापालिका प्रशासनाला देणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी भूसंपादनासाठी २५ लाख रुपये दिले आहेत, हे विशेष. महापालिकाने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जागेची मोजणी झाल्यानंतर कलम ११ नुसार कारवाई करुन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. जागेची मोजणी आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सरळ पद्धतीने भूमिअधिग्रहण करुन १४ एप्रिल रोजी स्मारकाचे भूमिपूजन करावे. भूसंपादनासाठी सर्व निधी हा शासनाने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांनी केली आहे.