इंद्रपुरीतील महिलांचा ‘अंबा’ अवतार

By Admin | Updated: June 25, 2014 23:30 IST2014-06-25T23:30:10+5:302014-06-25T23:30:10+5:30

शहरातील रहाटगावनजीकच्या बायपासवर घडलेल्या सामूहिक अतिप्रसंगाच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक सामाजिक संघटना

The 'Amba' incarnation of women of Indrapuri | इंद्रपुरीतील महिलांचा ‘अंबा’ अवतार

इंद्रपुरीतील महिलांचा ‘अंबा’ अवतार

आरोपीचे वकील प्रशांत देशपांडे यांचा पुतळा जाळला
अमरावती : शहरातील रहाटगावनजीकच्या बायपासवर घडलेल्या सामूहिक अतिप्रसंगाच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक सामाजिक संघटना एकजूट झाल्या आहेत. विशेषत: महिलांसाठी कार्यरत संस्था संघटना या घटनेचा आक्रमक निषेध नोंदवित आहेत. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतल्याचा निषेध म्हणून बुधवारी शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाबाहेर वकील प्रशांत देशपांडे यांचा पुतळा जाळला. दिग्रसच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी रहाटगाव येथील आरोपी सतिश शिवनारायण जयस्वाल (३२) व रुपेश हिम्मत वडतकर(३०, दोन्ही रा. रहाटगाव) यांना शुक्रवार, २० जून रोजी अटक केली. या घटनेने समाजमन हादरून गेले. समाजातील सर्वच घटकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. तरूणीचे आयुष्य नासविणाऱ्या त्या नराधमांना कठोेरात कठोर शिक्षा व्हावी, असाच सूर सर्वत्र समाज घटकातून उमटत आहे.
निर्जनस्थळी पोलीस गस्त,
१० प्रेमीयुगुलांना अटक
शहरातील निर्जनस्थळी मुक्तसंचार करणाऱ्या प्रेमीयुगुलांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात युध्दस्तरावर सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी दहा प्रेमीयुगुलांविरुद्ध कारवाई करुन त्यांना अटक केली आहे.
विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व आघाड्यांवर कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात महिला उपनिरीक्षकांच्या चार विशेष पथकांचे गठन करण्यात आले आहे. यापथकाने बुधवारी शहरातील छत्रीतलाव परिसरात मुक्तसंचार करणाऱ्या १० जोडप्यांना अटक केली. यामध्ये गणेश गजानन निमकरडे (२१,रा. परतवाडा), विकास धनराज कांबळे (२२, रा. लुंबिनी नगर) व शांतानंद सुरेश विघे (२८, देवरी निपाणी) यांच्यासह अन्य दहा प्रेमीयुगुलांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली.
हैवानांना फाशीची शिक्षा द्या;
जनविकास काँग्रेसची मागणी
जनविकास काँग्रेसने पोलीस आयुक्तांना सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडित युवतीला न्याय देऊन आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. राक्षसी वृत्तीच्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी या निवेदनातून जनविकास महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रभा आवारे, कार्याध्यक्ष कीर्तीमाला चौधरी, सचिव सुनंदा खरड यांनी केली आहे.

Web Title: The 'Amba' incarnation of women of Indrapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.