Amba Express has a place in 600 trains across the country | अंबा एक्स्प्रेसला देशभरातील ६०० गाड्यांत स्थान
अंबा एक्स्प्रेसला देशभरातील ६०० गाड्यांत स्थान

ठळक मुद्देठरली उत्कृष्ट, लूक बदललामध्य रेल्वे भुसावळ विभागातून एकमेव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या पसंतीस अव्वल ठरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या देशभरातील ६०० उत्कृष्ट गाड्यांच्या यादीत आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागातून यादीत स्थान मिळविणारी ही एकमेव रेल्वे गाडी आहे.
अंबा एक्स्प्रेस ७ सप्टेंबर २००७ रोजी सुरू झाली. आजतागायत ही गाडी हाऊसफुल धावत आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागात सर्वाधिक उत्पन्न देत असल्याची नोंद रेल्वे विभागाने घेतली आहे. मात्र, गाडीचा लूक आणि सुविधा उच्चस्तरीय नव्हत्या. मध्यंतरी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी देशात ६०० ट्रेन उत्कृष्ट बनविण्याची घोषणा केली आणि अंबा एक्स्प्रेसचे भाग्य उजाळले. आता अंबा एक्स्प्रेसला पिवळा-लाल अशा दुहेरी रंगाने सजविण्यात आले आहे. या गाडीची अंतर्बाह्य स्वच्छता राखली जात आहे. रेल्वे विभागाने अंबा एक्स्प्रेसला प्रेस्टीजियस ट्रेन म्हणून गौरविले आहे.

रंगसंगतीसह एलबीएच कोच लागले
अंबा एक्स्प्रेसच्या जुन्या डब्यांची आसन क्षमता ७२ होती. आता पिवळ्या-लाल रंगाच्या डब्यात ८२ आसन क्षमता आहे. एलईडी दिवे, सुसज्ज वातानुकूलन व्यवस्था, प्रशस्त सीट, नव्या आकाराचे शौचालय, आसनानजीक मोबाइल चार्जर आदी अद्ययावत सुविधा या डब्यांमध्ये उपलब्ध आहेत.

अंबा एक्स्प्रेसची भुसावळ येथे रंगरंगोटी करण्यात आली. ही २२ डब्यांची रॅक नटली आहे. देशातील ६०० गाड्यांमध्ये तिला स्थान मिळाले आहे.
- एन. एम. टेंभुर्णे, प्रमुख, कॅरेज अ‍ॅन्ड वॅगेन, अमरावती रेल्वे स्थानक


Web Title: Amba Express has a place in 600 trains across the country
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.