उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:36 IST2018-04-27T01:36:03+5:302018-04-27T01:36:03+5:30
वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार
सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कितीही पाणीटंचाई असली तरी येथील नागरिकांना त्याची झळ पोहचत नाही.
तालुक्यात अमदाबाद गाव केवळ २० घरांच्या वस्तीचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीडशेच्या घरात आहे. पालवाडी, भाम्बोरा, अमदाबाद अशा तीन गावांमिळून पालवाडी नावाने गटग्रामपंचायत आहे. गावात जाताना खडतर रस्त्यातून वाट काढावी लागते. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावात भरपूर पाणी असल्याने प्रत्येकाच्या शेतात सिंचनाची सोय आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शेतकरी संपन्न आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना गावात सर्वत्र हिरवळ दिसून येते. येथील मुख्य पीक संत्र्याचे असून, सोबतच भाजीपाला व पारंपरिक उत्पन्न घेत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गावाच्या दक्षिणेकडून काही अंतरावर अप्पर वर्धा धरणाचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्यामुळे येथील जलस्त्रोत वाढलेला आहे. गावात बाराही महिने पाणी आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून भरीव उत्पादन शेतीतून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी सर्वत्र कल्लोळ माजला असताना या गावात सर्वत्र हिरवळीचे वातावरण आहे. या गावातील नागरिक खरोखरच भाग्यवान समजल्या जात आहे.
कवडाची महाराज नागरिकांचे श्रद्धास्थान
गावाचे ग्रामदैवत कवडाजी महाराज असून येथे सर्व गावकरी मिळून मोठा सप्ताह थाटात साजरा करतात. गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होऊन याला सहकार्य करतात. लगतच्या खेड्यातून नागरिक येथे महाप्रसादाकरिता येतात. त्यामुळे आगळेवेगळे महत्त्व सांगायला गावकरी विसरत नाही.
शेतकऱ्याच्या शेतातून गावाला पाणीपुरवठा
अमदाबाद गाव पालवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने गावात घरगुती नळ योजना नसली तरी गावातीलच एका शेतकºयाने आपल्या मालकीच्या विहिरीतून नळ कनेक्शन गावकऱ्यांना दिले आहे. गावातील सर्व विहीर व बोअरवेलला भर उन्हाळ्यातही मोठा जलसाठा असल्याने गावकरी समाधानी आहे.