पथ्रोट : दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्याच्या घरात पांढऱ्या सोने आले असल्याने त्यांना पुढील व्यवहार करण्याकरिता दिलासा मिळाला आहे. दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे पी्र-मान्सून कपाशी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कपाशी पीक फुलपात्यांनी चांगलेच बहरल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस दसऱ्याच्या आधीच निघण्याला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतीची सर्व कामे आटोपल्यामुळे मजुरांना सुद्धा काम मिळत नव्हते. परंतु कापूस निघायला सुरूवात झाल्यामुळे महिला मजुरांना काम मिळायला सुरूवात झाली आहे.यामुळे मजूरवर्ग सुद्धा समाधानी आहे. पथ्रोट परिसरातील जमीन सुपिक आहे. परिसरातील शहानूर, गोंडवाघोली, खतीजापूर, रायपूर, थापेरा धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणीसाठा असतो. त्यामुळे या परिसरातील बरेचसे शेतकरी प्री-मान्सून कपाशी व हिरव्या वांगीची पिके घेतात. गहू पीक निघाल्यानंतर गव्हाची शेती ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी करून तयार ठेवतात व १५ ते २० मे पासून तयार केलेल्या शेतीमध्ये ट्रॅक्टरने किंवा वखराने गाळ काढून आपल्या सोईनुसार ठिबक, स्प्रिंकलद्वारे किंवा सरीने पाणी सोडून प्रि-मान्सून कपाशी पिकाची पेरणी करतात. पीक उभे झाल्यानंतर डवरणी, वखरणी, निंदण खुरपणी व खताचा मावा देवून आपल्या शेतात कपाशी पीक उभे करतात. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कपाशी पिकाची जोमात वाढ झाल्यामुळे दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्याच्या घरात कापसाचे आगमन होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. (वार्ताहर)
दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने
By admin | Updated: September 17, 2016 00:31 IST