आधीच फाल्गून मास, त्यात होळीचा उल्हास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST2021-03-27T04:13:01+5:302021-03-27T04:13:01+5:30

कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढ, नागरिकांचा बिनधास्त संचार, बाजारात लोकांची झुंबड संजय खासबागे वरूड : देशात १५ फेब्रुवारीला सुरू झालेली ...

Already Falgun Mass, Holi festivities in it! | आधीच फाल्गून मास, त्यात होळीचा उल्हास!

आधीच फाल्गून मास, त्यात होळीचा उल्हास!

कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढ, नागरिकांचा बिनधास्त संचार, बाजारात लोकांची झुंबड

संजय खासबागे

वरूड : देशात १५ फेब्रुवारीला सुरू झालेली कोविड-१९ साथीची दुसरी लाट शंभर दिवसांपर्यंत राहू शकते, असे संकेत असताना ग्रामीण भाग व आठवडी तथा दैनंदिन बाजारातील गर्दीत तसुभरही कमी आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग वाढता असताना, होळी साजरी करू नये, असे आदेश देण्यात आले असतानाही नागरिकांनी होळी तथा रंगपंचमीची जोरदार खरेदी चालविली आहे. त्यामुळे आधीची कोरोनाच्या स्वरूपात फाल्गून मास असताना त्यात होळी, रंगपंचमीचा उल्हास सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोरोना लॉकडाऊनला २३ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, वरुड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला. आता दुसऱ्या लाटेचा कोरोना अख्ख्या परिवाराला संक्रमण करीत असल्याने चिंतेत भर पडली आहे. परंतु आरोग्य यंत्रणा जरी सतर्क असली तरी मात्र आपत्ती व्यवस्थापन समिती गेली कुठे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यातच ग्रामीण व शहरी तोंडवळा लाभलेल्या नगरपालिका शहरात कुठेही कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी होत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे.

एक वर्षांपासून कोरोनाने नागरिकांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने दुकानाची वेळ सकाळी ९ ते ५ अशी केली. शनिवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत लॉकडाऊन व ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत. परंतु हे आदेश पाळतात तरी कोण, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहरात कोरोनाने उग्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. वरूड शहर कोरोना हॉटस्पॉट होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. तरी मात्र सार्वजनिक कार्यक्रम सुरूच असून राजकीय कार्यक्रमसुद्धा घेतले जात आहेत. यातून एक कार्यक्रमातून २५ चे वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याचे सांगण्यात येते. तरी मात्र सार्वजनिक कार्यक्रम सुरूच आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी आपत्ती व्यवस्थापन समिती सुस्त असल्याचे चित्र आहे. नागरिकही सुस्त झाले असून बिनधास्तपणे वावर सुरु असतो. केदार चौक, महात्मा गांधी चौक, सावता चौक, कुबडे चौक या परिसरात दैनिक बाजार भरतो. मात्र याला आठवडी बाजाराचे स्वरूप आलेले असते. रस्त्यावरच भाजीपाल्याचे दुकाने लावली जात असताना महसूल, नगर परिषद आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने कोरोनाचा वाढतात प्रादुर्भाव नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात केवळ ५ वाजता दुकाने बंद करण्याकरिता नगर परिषदेची गस्त असते. एरवी शहरातील गस्त बंद असून नागरिकांनाच मुक्त संचार सुरू आहे. अधिकारी केवळ कारवाईचे फतवे काढतात. परंतु प्रत्यक्षात कारवाई शून्य असल्याचे चित्र आहे. रस्ते गजबजलेले दिसतात.

थेट फौजदारी कार्यवाही

कोरोनाचा वाढाता प्रादुर्भाव असल्याने शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे. अकारण गर्दी करू नये, विनामास्क संचार करताना आढळून आल्यास थेट फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी सतर्क राहावे

शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांनी सतर्क व्हावे, मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, अकारण रस्त्यावर फिरू नये, ताप, सर्दी झाल्यास विनाविलंब उपचार करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे.

त्रास होत असेल तरच रुग्णालयात या

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ताप, सर्दी, खोकला, किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तातडीने ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणी करावी. सामाजिक अंतर राखूनच दुसऱ्यासोबत बोलणे - चालणे ठेवावे, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी सांगितले.

Web Title: Already Falgun Mass, Holi festivities in it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.