राज्यात महाविकास आघाडी साथ-साथ; जिल्ह्यात सेना-काँग्रेसची पाठीला पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:16 IST2021-08-14T04:16:32+5:302021-08-14T04:16:32+5:30
जिल्हा परिषदेत तिन्ही पक्ष एकत्र, अमरावती महापालिकेतील भाजपकडे एकहाती, पंचायत समितींमध्ये सत्तेचा संमिश्र वाटा अमरावती : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, ...

राज्यात महाविकास आघाडी साथ-साथ; जिल्ह्यात सेना-काँग्रेसची पाठीला पाठ
जिल्हा परिषदेत तिन्ही पक्ष एकत्र, अमरावती महापालिकेतील भाजपकडे एकहाती, पंचायत समितींमध्ये सत्तेचा संमिश्र वाटा
अमरावती : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही भिन्न विचारसरणीचे पक्ष महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तिन्ही पक्षाची आपसात कुरबुरी सुरू असली तरी जनतेच्या हिताचा निर्णय घेताना ‘हम साथ साथ है’ असे अनेकदा अनुभवास आले आहे. मात्र, जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांमध्ये स्थानिक राजकारणाला महत्त्व देत युती, आघाड्यांवर भर दिला गेला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण जुळून येताच महापालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील १४ पैकी सहा पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाची सत्ता आहे. भातकुलीत शिवसेना-भाजप एकत्र आले. तिवसा येथे प्रशासक आहे. चांदूर रेल्वे, दर्यापूर व अंजनगाव सुर्जीत भाजप, तर धारणी येथे आमदार राजकुमार पटेल यांचे पॅनेल आहे. चांदूर बाजारात प्रहारच्या हाती सत्ता आहे. अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रस, राष्ट्रवादी, सेना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. अमरावती महापालिकेत भाजपचे ४५ सदस्य असून, एकहाती सत्तेच्या चाव्या आहेत.
---------------------
पंचायत समिती
जिल्ह्यात १४ पंचायती समिती आहे. सहा पंचायतींमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. धारणीत भाजप असले तरी १० सदस्य हे आमदार राजकुमार पटेल यांचे समर्थक आहेत. त्यामुळे येथे भाजप शून्य झाली आहे. नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेस ४, बसपा २ तर सेना, भाजप प्रत्येकी एक असे आठ सदस्य असून, काँग्रेसची सत्ता आहे. धामणगाव रेल्वेत भाजपचे ८ आणि कॉंग्रेसचे ६ सदस्य आहेत. चिखलदरा येथे काँग्रेसचे ६, राष्ट्रवादी १, भाजप १ असे ८ सदस्य आहे. येथे काँग्रेसची सत्ता आहे. दर्यापुरात सेना, भाजप व अपक्षांनी सत्ता मिळवित काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.
-----------------
जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेत एकूण ५९ सदस्यसंख्या आहे. येथे महाविकास आघाडीची सत्ता आहे. कॉंग्रेस २६ व सेना, राष्ट्रवादी प्रत्येकी ३ सदस्यसंख्या आहे. भाजप ७, प्रहार ५, लढा १ हे विरोधात आहेत. अध्यक्षपद काँग्रेसच्या, तर उपाध्यक्ष सेनेच्या ताब्यात आले.
--------------------
अमरावती महापालिका
अमरावती महापालिकेत एकूण ८७ निवडून आलेले, तर ५ सदस्य स्वीकृत सदस्य असे ९२ सदस्य संख्या आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून, भाजपचे ४५, युवा स्वाभिमान ३ व रिपाइं (आठवले गट) १ असे मित्रपक्षाचे ४९ सदस्य सत्ता पक्षस्थानी आहे. काँग्रेसचे १५, एमआयएम १० आणि बसपाचे ७ सदस्य विरोधात आहेत.
-----------------
पक्षांचे जिल्हाप्रमुख म्हणतात...
‘‘ येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या कॉंंग्रेस स्वबळावर लढणार आहोत. तसे संकेतही पक्षाध्यक्षांनी दिले आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप वगळता मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू. महापालिका निवडणुकांचा निर्णय वरिष्ठ घेतील.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
-------------
‘‘ महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक कशाप्रकारे लढविणार, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा निर्णय सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमताने मान्य करतील. परंतु, पक्षनेतृत्वाने जिल्ह्याची भौगोलिक, राजकीयदृष्ट्या माहिती विचारल्यास तसे सांगता येईल.
- सुनील खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख
----------
‘‘ महाविकास आघाडीचे पडसाद जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवरही उमटतील, यात दुमत नाही. परंतु, दिग्गज, प्रभावी नेत्यांना पक्षाच्या सिम्बॉलची गरज राहत नाही. आताच युती, आघाडीवर बोलणे योग्य नाही. वेळेवर जो काही निर्णय होईल, त्यानुसार वाटचाल करण्यात येईल.
- सुनील वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
----------------------
तीन पक्ष, तीन विचार
१) काँग्रेस पक्षाची विचारसणी ही धर्मनिरपेक्ष आहे. देशाची एकता, अखंडतेवर काँग्रेसची पायाभरणी आहे. मात्र, राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने सेना-राष्ट्रवादीला साथ देत सत्तेचा वाटा मिळविला आहे. काॅंग्रेस महाविकास आघाडीत सामील होताच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत.
२) शिवसेनेची स्थापना ही मुळात हिंदुत्ववादी, मराठी माणसाच्या न्याय, हक्कांसाठी झालेली आहे. गत २५ वर्षे भाजपसोबत युती करून सेना राज्यात सत्तेतही होती. मात्र, भाजपसोबत मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.
३) राष्ट्रवादी कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष म्हणून उद्यास आला आहे. राष्ट्रवादीची विचारणीसुद्धा धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. मात्र, राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष असल्याची वारंवार टीका होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीने मोलाची भूमिका बजावली. शरद पवार हे आघाडीवर होते. महाविकास आघाडीचा जन्म यातूनच झाला.
-------------------