एकट्यानेच केल्या १६ घरफोड्या
By Admin | Updated: July 7, 2014 23:18 IST2014-07-07T23:18:40+5:302014-07-07T23:18:40+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन पोलीस ठाण्यांतर्गत १६ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

एकट्यानेच केल्या १६ घरफोड्या
अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन पोलीस ठाण्यांतर्गत १६ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. राहुल बाळकृष्ण बेडेकर (३२,रा.गांधी चौक), असे आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंतचा चोरीचा सर्व ऐवज त्याने आपल्या घरातच ठेवलेला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
आरोपी राहुल बेडेकर याने चौकशीदरम्यान १६ घरफोड्यांची कबुली दिली. त्यामध्ये राजापेठ परिसरातील आठ घरफोड्यांमधील ३ लाख २४ हजारांचा ऐवज, कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोड्यांमधील ८५ हजारांचा ऐवज व फे्रजरपुऱ्यातील दोन घरफोड्यांमधील १ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. चोरट्याने सर्व घरफोड्या कुलूपबंद घरांतच केल्या आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडून आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ लॅपटॉप, २ सीपीयू, ७० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो चांदीचे दागिने, ३ सीसीटीव्ही कॅमेरे, १० मोबाईल, २ होमथिएटर, १ कॅमेरा, स्टेशनरी वस्तू व कपडे आरोपीच्या घरातून जप्त केले.
सीसीटीव्ही फुटेजवरुन चोराचा सुगावा
शहरातील चोरीच्या घटनांमधील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये तिरुपती सेल्स प्रतिष्ठानात झालेल्या चोरीमध्ये राहुल बेडेकर पोलिसांना आढळून आला. या फुटेजच्या आधारेच पोलिसांनी राहुलला अटक केली.