आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:12 IST2018-04-03T00:12:21+5:302018-04-03T00:12:21+5:30
वेतनावरील खर्चाचे नियंत्रण व सुधारित आकृतीबंध निश्चितीच्या नावाखाली शासनाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेट, सेट, पीएचडी पदवीधारक बेरोजगार झाले असून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने केली.

आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वेतनावरील खर्चाचे नियंत्रण व सुधारित आकृतीबंध निश्चितीच्या नावाखाली शासनाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेट, सेट, पीएचडी पदवीधारक बेरोजगार झाले असून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने केली.
उच्च शिक्षण सहसंचालक अर्चना नेरकर यांना निवेदनातून नेट, सेट, पीएचडीधारकांनी कैफियत मांडली. शासनाने सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद केल्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही आमच्या वाट्याला बेरोजगारी आली. एकीकडे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये, विद्यापीठांची निर्मिती करावी, तर दुसरीकडे पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी वणवण भटकावे लागत असल्याची व्यथा बेरोजगारांना मांडली. राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.
पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. प्राध्यापक भरती बंदी उठविण्यासंदर्भात मागणी करूनही शासन ठोस पाऊल उचलत नाही. उच्च शिक्षण घेऊनही शासन नोकरी देत नसल्याने त्यापेक्षा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वप्नील देशमुख यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.