दुष्काळग्रस्तांना होळीपूर्वी मदत वाटप
By Admin | Updated: February 25, 2015 00:26 IST2015-02-25T00:26:30+5:302015-02-25T00:26:30+5:30
मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी ...

दुष्काळग्रस्तांना होळीपूर्वी मदत वाटप
जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान सचिवांचे आदेश
अमरावती : मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी म्हणजेच होळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी घेतलेल्या २१ फेब्रुवारीच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करुन त्यातून शासकीय थकबाकीची वसुली करू नये, असेही निर्देश आहेत. शेतकऱ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत कशी द्यावी, यासंदर्भातही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये खाते नसलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास सूचित करण्यात आले आहे. मदत वाटप आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेत.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी स्तरावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांना वेळेवर कसा देता येईल, यावर प्रशासनाने भर द्यावा आणि ही आर्थिक मदत ७ मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला प्रधान सचिवांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)