पदाधिकाऱ्यांचे खाते वाटप
By Admin | Updated: November 8, 2014 00:44 IST2014-11-08T00:44:07+5:302014-11-08T00:44:07+5:30
जिल्हा परिषदेच्या नवीन उपाध्यक्षांसह दोन सभापतींचे खाते वाटप शुक्रवार ७ नोहेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या ...

पदाधिकाऱ्यांचे खाते वाटप
अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन उपाध्यक्षांसह दोन सभापतींचे खाते वाटप शुक्रवार ७ नोहेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली.
या पदाधिकाऱ्यांचे खाते वाटपाबाबतचे धोरण सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सभेपूर्वीच ठरवून ही बाब सभेपर्यंत आपल्यापूरतीच मर्यादित ठेवली. केवळ नियमानुसार औचारिकता म्हणून ही सभा घेण्यात आली. या सभेत जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांनी उपाध्यक्ष व दोन सभापतींच्या खाते वाटपाचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मांडला. या प्रस्तावास सभसगृहात उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेचे सचिव के. एम. अहमद यांनी या अध्यक्षांच्या सहमतीने खाते वाटप जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेल्या खाते वाटपाच्या चर्चावर पडदा पडला आहे.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत . त्यानुसार अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे स्थायी आणि जलव्यवस्थापन समिती. उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांच्याकडे वित्त व आरोग्य समिती. सभापती गिरीश कराळे यांच्याकडे बांधकाम व शिक्षण समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. सभापती वृषाली विघे यांचेकडे महिला व बालकल्याण समिती, तर समाजकल्याण समितीची जबाबदारी सभापती सरिता मकेश्र्वर यांच्याकडे आणि कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याची धुरा सभापती अरूणा गोरले यांच्याकडे देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चार जिल्हा परिषद सभापतीची निवडणूक विधानसभेच्या धामधुमीत आटोपली. मात्र, याचवेळी निवडणुकीची आचासंहिता असल्यामुळे जिल्हा परिषदेतील नवीन शिलेदारांना यावेळी खातेवाटप होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या आहेत. आता कामकाजाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. खाते वाटपाच्या सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यक्रम अधिकारी के. एम. अहमद यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वऱ्हाड विचार मंच, जनसग्राम, प्रहार, रिपाइं, बसप आदी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)