युती सरकार शेतकरीविरोधी

By Admin | Updated: April 1, 2017 00:08 IST2017-04-01T00:08:32+5:302017-04-01T00:08:32+5:30

राज्यशासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळविण्याकरिता तुम्हा शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून शेतकऱ्यांनी साथ दिली तर युती सरकारला हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही.

Alliance government is anti-farmer | युती सरकार शेतकरीविरोधी

युती सरकार शेतकरीविरोधी

पृथ्वीराज चव्हाण : संघर्ष यात्रेत कर्जमाफीसाठी विरोधकांचा हुंकार
चांदूररेल्वे : राज्यशासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळविण्याकरिता तुम्हा शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून शेतकऱ्यांनी साथ दिली तर युती सरकारला हद्दपार करण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातील युती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत नसून ते भांडवलदारधार्जीणे असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, जनता दल (यू), एमआयएम, पीरिपा (कवाडे) यापक्षांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून काढलेली संयुक्त संंघर्ष यात्रा गुरूवारी चांदूररेल्वे शहरात पोहोचल्यावर येथील जुन्या मोटार स्टँड मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आ.जयंत पाटील, माजीमंत्री पतंगराव कदम, आ. विश्वजीत कदम, आ.विजय वडेट्टीवार, आ.नितेश राणे, आ.शशिकांत शिंदे, आ.कुणाल पाटील, आ.अभिजित सानप, आ.अबू आझमी, आ. रणजित कांबळे, आ.हर्षवर्धन सपकाळ,आ. जितेंद्र आव्हाड, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे उपस्थित होते.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार भांडवलधारांचे लाखो ंकोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याचे धोरण आखत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे योजना नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला ५० टक्के नफा होईल, असे शेतमालाचे दर ठरवू असे आश्वासन दिले होते.

हेच का अच्छे दिन
चांदूररेल्वे : मात्र, सत्तेत आल्यावर यासरकारची कर्ज माफ करण्याची इच्छाशक्ती नाही, असे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. मागील दोन वर्षांत साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू असेही अश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, रोजगार मिळाला नाही. हेच का ‘अच्छे दिन’ असा सवालही त्यांनी केला. विधानसभेतील १९ आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून निलंबित के ले. त्यामुळे आता जनता दरबारात संयुक्तपणे हजर झाल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची मानसिकता कर्ज माफ करण्याची नाही, असा आरोप केला. ते म्हणाले, सत्ताधारीपक्षाने अंदाजपत्रकात शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची तरतूद केली नाही. विधानसभेत याचा विरोध करणाऱ्या आमदारांचे निलंबन केले. आमदार जनतेचे प्रतिनिधी आहेत. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हाप्रकार आहे. संघर्ष यात्रेला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने सरकार हतबल झाल्याचा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ जयंत पाटील म्हणाले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने कर्जमाफी झाली होती. आता संघर्ष यात्रा व विधानसभेत आमदारांचा हल्लाबोल यामुळे सत्ताधाऱ्यांनी कर्जकपातीचा निर्णय मागे घेतला आहे. यावेळी अन्य नेत्यांनी देखील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीवर जोरदार हल्ला चढविला. यासभेसाठी नगराध्यक्ष सिद्धू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुबे, सभापती प्रभाकर वाघ, उपसभापती अशोक चौधरी, गणेश आरेकर, कलवटे, भिंडे, सतपाल वरठे, गोविंदराव देशमुख, बंडू देशमुख, बंडू मुंदडा, प्रदीप वाघ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आ. जगताप यांचे
सरकारवर ताशेरे
धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे संघर्ष यात्रेच्या चांदूररेल्वे येथील सभेच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी होती. त्यानुसार आमदार जगतापांनी युती सरकारवर जोरदार हल्ला केला. हे सरकार शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेला जमलेली गर्दी ही सरकारविरोधी असंतोष व्यक्त करणारी असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

क्षणचित्रे
सभा सुरू होण्यापूर्वी सप्तखंजेरीवादक संदीपपाल महाराज यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे चित्र कीर्तनाच्या माध्यमातून उभे केले.
सभेसाठी ग्रामीण भागातील हजारो शेतकरी मिळेल त्या वाहनाने चांदूररेल्वे येथे आले होते.
आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी जमलेली गर्दी पाहून ते तुमचेच काय तर आमचेही नेत आहेत, अशी पुष्टी सभेला संबोधित करताना सर्वच नेत्यांनी जोडली.
सभेसाठी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आल्याने शहरात वाहनांची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी शहरात येणारी वाहतूक चार तास रोखून धरली होती.

Web Title: Alliance government is anti-farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.