काजलडोह शाळेतील सर्व शिक्षक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:05 IST2017-07-18T00:05:18+5:302017-07-18T00:05:18+5:30
मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची ओरड सातत्याने होत असते. शिक्षकांची अनास्था हे देखील यामागील एक प्रमुख कारण आहे.

काजलडोह शाळेतील सर्व शिक्षक बेपत्ता
पं.स.सदस्य, सरपंचांची आकस्मिक भेट : पंचनाम्यानंतर शाळेला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
चुर्णी : मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची ओरड सातत्याने होत असते. शिक्षकांची अनास्था हे देखील यामागील एक प्रमुख कारण आहे. नजीकच्या काजलडोह येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत सर्व सहाही शिक्षक बेपत्ता आढळून आले. पं.स.सदस्य व सरपंचांनी सोमवारी या शाळेला दिलेल्या आकस्मिक भेटीतून मेळघाटातील शिक्षणाची दुरवस्था उघड झाली. सहापैकी एकही शिक्षक हजर नसल्याने पं.स.सदस्यांसह सरपंचांनी या शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांना सुटी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चिखलदरा शहरातील शाळांची अवस्था अशीच विदारक आहे. येथील शाळांमध्ये शिक्षकांचा पत्ताच नसतो. पं.स. सदस्य प्रतिभा रोहित कंगाले व सरपंच कांताबाई यांनी सोमवारी काजलडोह शाळेला भेट दिली. यावेळी वर्गखोल्यांना कुलूप असल्याने विद्यार्थी वऱ्हांड्यात बसून होते. विद्यार्थ्यांना विचारणा केली असता शिक्षक अनुपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता एकाचवेळी अनुपस्थित राहणाऱ्या शिवचरण ठाकूर, नारायण बेठेकर, इंगळे, संगीता इसळ, देवराव अमोदे, सुनील झारखंडे या सहाही शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सहा शिक्षकांवर तातडीने कारवाई न झाल्यास शाळेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालकांनी दिला.
यावेळी पं.स. सदस्य प्रतिभा कंगाले, सरपंच कांता कवडे, शाळा समिती अध्यक्ष विनायक काडमू कवडे, सुनील मालू कुमरे, उपाध्यक्ष आशा अचोटे, ग्रापं सदस्य मंगलसिंग कुमरे, मनोज बेलकर, वीरू मरसकोल्हे, संदीप कुमरे, संजय कंकोडे, शालिक इवने, राजेश बेलकर, कलेसिंग उईके, आदी पालकांची उपस्थिती होती.