महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:48+5:302021-02-13T04:14:48+5:30
महापौरांचा निर्णय, कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात घेतला आढावा, इयत्ता दहावी, बारावीच्या वर्गांना सूट अमरावती : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता ...

महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
महापौरांचा निर्णय, कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात घेतला आढावा, इयत्ता दहावी, बारावीच्या वर्गांना सूट
अमरावती : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता आलेख बघता प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहील, असा निर्णय महापौर चेतन गावंडे यांनी गुरूवारी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १३ फेब्रुवारीपासून सुरू करावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी यांना दिलेत.
शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे. कोविड- १९ आजाराबाबत महानगरपालिका परिक्षेत्रात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी गुरुवारी महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. यावेळी कोरोना संसर्ग आणि वाढत्या रूग्णांबाबत मंथन करण्यात आले. दरम्यान शाळा सुरू असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. हल्ली महापालिका क्षेत्रातील शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा एकाही शाळेत विद्यार्थी संक्रमित आढळले नाही. मात्र, कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेता शाळांमध्ये गर्दी झाल्यास विद्यार्थी पॉझिटिव्ह निघू शकतात, असे धाेक्याचे संकेत आरोग्य यंत्रणेने आढावा बैठकीत दिले. त्यामुळे महापौर गावंडे यांनी महापालिका परिक्षेत्रातील शाळा १३ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत वर्ग १० आणि १२ वी वगळून इतर वर्गासाठी शाळा बंद ठेवण्याचे ठरविले.
या बैठकीला उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती राधा कुरील, आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक विलास इंगोले, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) सीमा नेताम, शिक्षणाधिकारी अब्दुल राजीक, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंन्द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, जयश्री नांदुरकर, मानसी मुरके, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण उपस्थित होते.
----------
हे सुद्धा झाले निर्णय
- कोरोना नियमावलींचे पालन करण्यासाठी दंडात्मक कारवाईला वेग
- अतिक्रमण विभाग, बाजार व परवाना विभाग व पशुशल्य विभागाचे स्वतंत्र पथक
- बाजारपेठेत नियमांचे पालन न करणारे प्रतिष्ठाने सील करावे
- एसटी, ऑटोरिक्षा चालकांना मास्क वापराची सक्ती
- मंगल कार्यालय संचालकांनी पालन करावे
- कोरोना रुग्ण तपासणीला वेग
---------------