सर्वच शेतकरी होणार सोसायटीचे सभासद

By Admin | Updated: October 6, 2016 00:32 IST2016-10-06T00:32:46+5:302016-10-06T00:32:46+5:30

जिल्ह्यातील सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध योजनांचा लाभ व्हावा,

All the farmers will be members of the society | सर्वच शेतकरी होणार सोसायटीचे सभासद

सर्वच शेतकरी होणार सोसायटीचे सभासद

अभियान राबविणार : सर्व शेतकऱ्यांना होणार कर्जाचा लाभ
अमरावती : जिल्ह्यातील सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध योजनांचा लाभ व्हावा, यासाठी सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केल्या जाणार आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा यासाठी अभियान राबविल्या जाणार आहे. यासाठी तालुकास्तरावरील चमू शेतकऱ्यांशी संपर्क करणार आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला कर्जासह सोसायटींच्या मध्यभागातून विविध सुविधांचा लाभ मिळावा व या माध्यमातून शेतकरी आर्थिक संपन्न व्हावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा गावातील सेवा सहकारी सोसायटीचा सभासद व्हावा, यासाठी हे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात ६२३ सोसायटी आहेत. या सोसायटीचे सभासद होण्यासाठी काही अटी आहेत. अनेक सातबाराधारक शेतकरी सोसायटीचे सभासद झालेले नाहीत. त्यामुळे सोसायटीच्या निवडणूक त्यांना सहभागी होता येत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जिल्हा बँकेद्वारा कर्ज मिळत नाही, अशा अनेक सुविधांपासून शेतकरी वंचित राहतात. शेतकऱ्यांना या सर्व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. यामुळे तालुकास्तर पथक करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे या महत्वाकांक्षी उपक्रमाविषयी गावस्तरावर सभा घेणे, भित्तीपत्रकांद्वारे व गावस्तरावर दवंडी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत.
एखाद्या सेवा सहकारी सोसायटीने शेतकऱ्याला सभासद पद देण्याचे नाकारल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ नुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सभासदपद मिळण्याबाबत अपिलाची तरतूद यामध्ये आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सांगितले.
शासनाचे सहकार विषयक या महत्वपूर्ण धोरणामुळे सहकार क्षेत्रात गत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या प्रस्तापितांना या निर्णयाचा जोरदार फटका बसणार आहे. तर सर्वसामान्य शेतकरी देखील आता सेवा सहकारी सोसायटींचे भागदारक व सभासद होणार असल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जिल्ह्यात २१ हजार शेतकरी सभासद होणे बाकी
जिल्ह्यात एकूण ६२३ शेतकरी सहकारी सोसायटी आहेत व जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकरी आहे. या सोसायट्यांचे ३ लाख ९४ हजार शेतकरी सभासद आहेत. अद्याप २१ हजार सभासद होणे बाकी आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधकाच्या अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे शेतकऱ्यांना सभासद केल्या जाणार आहे.

फक्त एवढे करणे गरजेचे
सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्जदार व्यक्ती १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची हवी. तो संस्थेच्या कार्यक्षेत्रामधला रहिवासी असावा व त्यांच्याकडे किमान १० हजार क्षेत्र जमीन धारणा असावी. याविषयीचा सातबारा हा पुरावा त्याने अर्जासोबत जोडावा तसेच पोट नियमाप्रमाणे १०० रुपये शुल्क व १०० रुपयांचा एक भाग संस्थेकडे जमा करणे आवश्यक असल्याचे नियमावली आहे.

जिल्ह्यात अजून २१ हजार शेतकरी सभासद होणे बाकी आहे. त्यांनी सभासद व्हावे यासाठी प्रत्येक गावात जनजागृती केल्या जात आहे. सहकार विभागाचा हा स्पेशल ड्राईव्ह आहे.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक

Web Title: All the farmers will be members of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.