आदिवासींच्या आरक्षणावर सर्वांचाच डोळा

By Admin | Updated: July 14, 2014 00:49 IST2014-07-14T00:49:09+5:302014-07-14T00:49:09+5:30

आरक्षणाने काहीअंशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक

All eyes on tribal reservation | आदिवासींच्या आरक्षणावर सर्वांचाच डोळा

आदिवासींच्या आरक्षणावर सर्वांचाच डोळा

पत्रपरिषद : मधुकर पिचड यांचा आरोप
अमरावती :
आरक्षणाने काहीअंशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगती करणाऱ्या आदिवासींच्या आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे आदिवासींसाठी राखीव आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या अमरावती शाखेच्यावतीने आयोजित आदिवासींचा शैक्षणिक व सांस्कृतिक संघर्ष मेळाव्यात उपस्थित झाले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन आदिवासी समाजाची सद्यस्थिती मांडली.
पिचड यांच्या मते, भारतीय राज्य घटना व राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला आरक्षण देताना संस्कृती, राहणीमान, बोली, भाषा आदी लक्षात घेत आरक्षण दिले. मात्र, आता काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट समाजाला खूश ठेवण्यासाठी आदिवासींच्या वाट्याला आलेले आरक्षण पळविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकही जमात आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. मात्र लोकसभा निवडणूक आटोपताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा बोलली जात आहे.
या समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र आदिवासींवर अन्याय करुन आरक्षण देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या राज्यात समाजाच्या स्तरानुसार आरक्षण देण्यात आले आहेत. कर्नाटकात मराठा तर छत्तीसगडमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यायचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घटनेने ठरविलेले निकष धुळीस मिळविण्याचा कोणी कटकारस्थान रचत असतील तर आदिवासी समाज वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मधुकर पिचड यांनी दिला. आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी समाजातील आमदार, खासदार एकत्र येऊन केंद्र शासनाकडे साकडे घालतील, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींच्या मूळ हक्कावर गदा आणण्यासाठी ५५ जमाती आघाडीवर आहेत. या जमातींना सर्वच राजकीय नेते खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रपरिषदेला विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, मेळघाटचे आ. केवलराम काळे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्यासह पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: All eyes on tribal reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.