मेळघाटातील ग्रामपंचायतींच्या निधीवर सर्वांचा डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST2021-04-09T04:13:23+5:302021-04-09T04:13:23+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : शासनाने पंचायत राज योजनेंतर्गत ग्रामपातळीवर कोट्यवधींचा निधी ग्रामपंचायतीकडे वळता केला. त्या विकास निधीचा जनउपयोगी कार्यासाठी ...

मेळघाटातील ग्रामपंचायतींच्या निधीवर सर्वांचा डोळा!
श्यामकांत पाण्डेय
धारणी : शासनाने पंचायत राज योजनेंतर्गत ग्रामपातळीवर कोट्यवधींचा निधी ग्रामपंचायतीकडे वळता केला. त्या विकास निधीचा जनउपयोगी कार्यासाठी वापर न करता स्वनामधन्य कंत्राटदारांनी ग्रामपंचायतींना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचे साहित्य गहाळ केल्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या पत्राने निष्पन्न झाले. मात्र, त्यांनी नेमलेली चौकशी समिती जिल्हा परिषदमध्ये बसलेल्या सदस्यांनी दडपविली.
दरवर्षीप्रमाणे या वित्त वर्षातसुद्धा तथाकथित कंत्राटदारांची कामे मिळविण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडे असणाऱ्या अधिकारांचा दुरुपयोग करीत काही जिल्हा परिषद सदस्यांकडूनही लॉबिंग सुरू झाली असून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावरील कामे मॅनेज करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आपल्या मनमर्जीप्रमाणे कामे ठरवून त्याप्रमाणे ग्रामपंचायतकडून ठराव बनविले जात आहे. असे प्रस्ताव तयार करताना ग्रामवासीयांना तसेच ग्रामपंचायतीमधील सदस्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ठराव तयार होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
कंत्राटदारांकडून लॉबिंग
मेळघाटात सध्या आदिवासींच्या विकासासाठी पेसा आणि ठक्कर बाप्पा या दोन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये विकासकामासाठी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करण्यासाठी दिले जाणार आहे. या पैशांचा उपयोग गाव स्तरावरील प्रमुख समस्यांच्या निराकरणासाठी आणि गावातील विकास साध्य करण्यासाठी खर्च करण्यात यावे या प्रामाणिक उद्देशाला पुन्हा एकदा हरताळ फासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मेळघाटातील ग्रामस्तरावर विकासकामाचे डोहाळे लागलेल्या तथाकथित कंत्राटदारांनी विकासकामे कसे प्राप्त होईल, यासाठी मोठ्या प्रमाणात खेळी चालविली आहे.