वनव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’
By Admin | Updated: February 4, 2016 00:21 IST2016-02-04T00:21:33+5:302016-02-04T00:21:33+5:30
यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. तर दुसरीकडे फेब्रवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वनवा लागण्याची दाट शक्यता आहे.

वनव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’
पाऊस अत्यल्प कोसळल्याचा परिणाम : फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल
अमरावती : यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. तर दुसरीकडे फेब्रवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वनवा लागण्याची दाट शक्यता आहे. परिणामी वनविभागाने वनवनव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ घोषित केले आहे. सॅटेलाईटद्वारे वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.
वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असली असताना जंगलात लागणाऱ्या वनवन्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा अंगिकार केला नाही. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगीवर पांरपरिक पद्धतीने वनकर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवित असल्याचे चित्र आहे. परंतु मनुष्यबळाचा वाणवा ही खरी समस्या वनवनवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागले आहे. मध्यंतरी दऱ्या, खोऱ्यात लागणाऱ्या जंगलातील आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मिळ वनौओषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दत्फरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वनवनव्यामुळे लाखो रुपयांचे तेंदू पाने जळून राखरांगोळी होतात, अशी माहिती आहे. मात्र कोकणमध्ये जंगल हे सदाहरित असल्यामुळे येथे वनव्याची भिती नाही. वनविभागाकडून वनवनव्याबाबत जनजागृती, प्रचार व प्रसार केला जातो. मात्र जंगलात वनवनव्यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य, सयंत्र, अग्निशमन वाहने आदींची व्यवस्था का केली जात नाही? हा सवाल यानिमित्त्याने उपस्थित होत आहे. जंगलात आग लागली की वनकर्मचारी हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून त्याने रात्रदिंवस आग विझविण्याचे काम करतात. हाच शिरस्ता वनविभागात अनेक वर्षांपासून कायम आहे. एकिकडे वनविभाग आधुनिकतेची कास धरल्याचा गवगवा करीत असताना वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, सयंत्राचा वापर का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. तप्त उन्हाळ्यात पानगळ झालेल्या पानांच्या घर्षणामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचारी दिवस रात्र एक करतात. मात्र ही आग एवढी भयंकर असते की ती आटोक्यात आणणे हे वनकर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर राहते. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक होते. यंदा वनवनवा लागण्याचे प्रमुख कारण हे पावसाचे पाणी कमी पडले हाच निष्कर्ष वनविभागाचा आहे.
आॅस्ट्रेलिया, चीनच्या धर्तीवर नियंत्रण असावे
समृद्ध जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आॅस्ट्रेलिया, मलेशिया व चीन या देशाने वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना राज्याने देखील कराव्यात अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. राज्यात वनवनव्यावर नियंत्रण करण्यासाठी वनकर्मचारी तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जंगलात मोठी आग लागल्याची घटना घडली की ते नियंत्रण करणे अशक्य ठरते.
यावर्षी जंगलात आग लागण्याची शक्यता अधिक
यावर्षी पाऊस अत्यल्प पडल्यामुळे उन्हाळा जोरदार तापणार आहे. किंबहुना १ फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली आहे. पाऊस कमी पडल्याने जंगलात गवत देखील वाढले आहे. त्यामुळे जंगलात आग लागण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. वनवनव्याच्या पार्श्वभूमिवर अलर्ट करण्यात आले आहे.
जंगलातील आग नियंत्रण करण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. १५ फेब्रवारी ते जून या कालावधीत जंगलात जाळ रेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्त्या देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे.
- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.