उरणच्या पार्श्वभूमिवर शहरात ‘अलर्ट’

By Admin | Updated: September 25, 2016 00:24 IST2016-09-25T00:24:04+5:302016-09-25T00:24:04+5:30

मुंबईतील उरण परिसरात चार बंदुकधारी व्यक्ती शिरल्याची माहिती मिळताच राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'Alert' in the city on the background of Uran | उरणच्या पार्श्वभूमिवर शहरात ‘अलर्ट’

उरणच्या पार्श्वभूमिवर शहरात ‘अलर्ट’

सणोत्सव : 'त्या' बंदुकधारींचे स्केच जारी, पथक सज्ज
अमरावती : मुंबईतील उरण परिसरात चार बंदुकधारी व्यक्ती शिरल्याची माहिती मिळताच राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तसेच आगामी नवरात्री उत्सवाच्या दृष्टीने शहर पोलीसही सतर्क झाले आहेत. बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे विविध गर्दीच्या ठिकाणाची तपासणी सुरू केली. शनिवारी पथकाद्वारे बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांजवळील बॅगांची तपासणी केली.
देशाच्या सीमेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर नवी मुंबईत तीन दिवसांपूर्वी चार शस्त्रधारी व्यक्ती शिरल्याचे काही विद्यार्थींना दिसले. त्याअनुषंगाने पोलिसांनी स्केच जारी केले आहे. अद्यापपर्यंत त्या अज्ञात व्यक्तींचा शोध लागलेला नाही. ते शस्त्रधारी व्यक्ती मुंबईतून कोणत्या दिशेने गेलेत, याविषयी निश्चीतता नसल्यामुळे राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
त्याअनुषंगाने शहर पोलीसही सतर्क झाले आहे. पोलीस विभागाकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी सुरू झाली असून गस्त वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मोठे मंदिरे तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वॉच ठेवलेला आहे. शुक्रवारी अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली असून मंदिर व्यवस्थापकांशी सुरक्षेसंबंधितांनी चर्चा केली.
शनिवारी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात पथकातील जवान व श्वान पथकाने बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानक, बसस्थानक, अंबादेवी व वॉलमार्ट परिसराची तपासणी केली.
शहरात कोठेही संशयित वस्तू किंवा बॅग आढळल्यास तत्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: 'Alert' in the city on the background of Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.