महापालिका ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नियुक्तीबाबत अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:55+5:302021-07-07T04:15:55+5:30
अमरावती : महापालिकेत ‘आऊट सोर्सिंग’ मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी नियुक्तीबाबत कंत्राटाने वेगळे वळण घेतले आहे. याप्रकरणी विराेधी पक्ष काँग्रेसने भाजपवर ...

महापालिका ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नियुक्तीबाबत अलर्ट
अमरावती : महापालिकेत ‘आऊट सोर्सिंग’ मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी नियुक्तीबाबत कंत्राटाने वेगळे वळण घेतले आहे. याप्रकरणी विराेधी पक्ष काँग्रेसने भाजपवर निशाना साधला आहे. त्यामुळे आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी बैठक घेतली आणि याबाबत नियमानुसार निर्णय घेऊ. राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असे बैठकीत ठरविण्यात आले.
महापौर चेतन गावंडे यांनी सोमवारी उशिरा सायंकाळी त्यांच्या दालनात काही पदाधिकारी, अधिकाऱ्यांसमवेत कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल कामगार एजन्सी नियुक्तीसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर या प्रकरणाने राजकारण तापले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक सलिम बेग आदींनी आयुक्त रोडे यांची भेट घेतली. ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नियुक्तीबाबत सत्तापक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. कंत्राट अथवा निविदा प्रक्रिया राबविणे हे प्रशासनाचे काम आहे. यात कोणत्याही पदाधिकाऱ्यांंना हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करावी आणि पात्र एजन्सीची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आयुक्त रोडे यांनी उपायुक्त रवींद्र पवार, लेखाधिकारी हेमंत ठाकरे यांना पाचारण केले. ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नियुक्तीबाबत ‘महाभारत’ जाणून घेतले. यात एकूण ८ एजन्सीच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. ईटकॉन्स ई सोल्युसन्सने दोन एजन्सी अपात्र असल्याची तक्रारही आयुक्तांकडे दिली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात एजन्सी निश्चित करण्यात येईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतल्याची माहिती आहे.
---------------
दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया
महापालिका प्रशासनाने ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नियुक्तीबाबत काढलेली निविदा प्रक्रिया ही दुसऱ्यांदा राबविली जात आहे. यापूर्वीदेखील राबविण्यात आली होती. दुसऱ्यांदा निविदेत अटी, शर्ती नमूद करून ती नव्याने राबविली जात आहे, हे विशेष.
------------------
कोट
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका