दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:12 IST2021-05-11T04:12:58+5:302021-05-11T04:12:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही मोर्शी तालुक्यातील घोडदेव येथील मध्य प्रदेश सीमेवर अवैध ...

दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर !
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही मोर्शी तालुक्यातील घोडदेव येथील मध्य प्रदेश सीमेवर अवैध दारूची विक्री बिनबोभाटपणे सुरू आहे. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मद्यपींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये बाहेरून दारू पिऊन आलेले गावात वावरतात व धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
मोर्शी तालुक्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाने भीषण रूप धारण केले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी तालुक्यातील दापोरी, हिवरखेड, डोंगरयावली, पाळा, चिखलसावंगी, खानापूर, पिंपळखुटा, अष्टगाव, दहसूर, पार्डी, मायवाडी, खोपडा, रिद्धपूर, खेड, तरोडा, नेरपिंगळाई, शिरूर, दाभेरी या गावांमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने ही गावे सील करण्यात आली आहेत.
मोर्शी तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे पाच दिवसांची संचारबंदी लावण्यात आली. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही मोर्शी तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दारुड्यांच्या हैदोसामुळे त्याचा काही उपयोग होत नसल्याचे चित्र मोर्शी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
घोडदेव हे मोर्शी तालुक्यातील महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे गाव असून, ते मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. या गावातील मध्य प्रदेश सीमेवर अवैध दारूचा महापूर आला आहे. तालुक्यातून बाहेरील गावातील शेकडो मद्यपी येथे दारू पिण्याकरिता येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे घोडदेव येथे अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर गर्दी वाढल्याचे दिसत आहे. शेजारी असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात म्हणेल तेवढी दारू येत असल्यामुळे लॉकडाऊन असूनही मागेल तेवढी दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे लॉकडाऊन आहे का नाही, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
बॉक्स
गावठीकडे अधिक कल
मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो दारुडे घोडदेव येथे सातपुडा पर्वताच्या कुशीत दारूची तलफ भागवत आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन संचारबंदीसाठी संपूर्ण ताकद लावून उभे असताना दुसरीकडे दारुड्यांच्या वाढत्या उपद्रवाने त्यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
मोर्शी तालुक्यात मध्य प्रदेशातून नकली दारू येत असून, याकडे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. काही दारू शौकीन देशी दारूपेक्षा गावठी दारूची मजा कुछ और म्हणून त्यांनी आपला मोर्चा घोडदेव येथे मध्य प्रदेशातून येत असलेल्या दारुकडे वळवला आहे.