दुसऱ्या दिवशीही आढळल्या दारुच्या बाटल्या
By Admin | Updated: November 7, 2016 00:15 IST2016-11-07T00:15:36+5:302016-11-07T00:15:36+5:30
जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसरात नेहमीच ओल्या पार्ट्या करण्यात येत असल्याचे आता सिध्द झाले आहे.

दुसऱ्या दिवशीही आढळल्या दारुच्या बाटल्या
परिस्थिती जैेसे थे : झाडाचा फांद्या टाकून लपविण्याचा प्रयत्न
अमरावती : जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कार्यालय परिसरात नेहमीच ओल्या पार्ट्या करण्यात येत असल्याचे आता सिध्द झाले आहे. रविवारी दुसऱ्या दिवशीही जलसंपदा विभागाच्या परिसरात दारुच्या बाटल्या आढळल्याने या प्रकरणाची कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
रविवारी या भागात पुन्हा स्टिंग केले असता शनिवारी ज्या उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला शौचालयाच्याजवळ या बॉटल्स आढळल्या होत्या, त्या बाटल्या उचलण्याऐवजी झाडाचा तोडलेल्या फांद्या टाकून पडदा पाडला. हा प्रकार येथे घडलाच नसल्याचे दाखविण्यात आले होते. पण येथे दारुच्या बॉटल्स जैसे थे पडून होत्या. त्यामुळे येथे नियमित मद्यपी या परिसरात मद्यपान करतात व ओल्या पार्ट्या झोडल्यानंतर परिसरातच रिकाम्या बॉटल्स, सोड्याची बाटली व डिस्पोजल ग्लास या ठिकाणी फेकून देतात. सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा जणू काही गोरखधंदाच थाटला आहे. रविवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाच्या बाजूला सुध्दा ज्या ठिकाणी वाहनांच्या स्टँड आहे. त्या ठिकाणी इमारतीला लागून असलेल्या खुल्या जागेत विविध प्रकारच्या ब्रँडच्या दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या बाजूलाच एक खड्डा आहे. या खड्ड्यातही अनेक बॉटल्स टाकण्यात आला होत्या. त्या बॉटल्स कुणाला दिसून नये, यासाठी झाडाचा खाली पडलेला पाला - पाचोळा त्या बाटल्यांवर टाकण्यात आला होता.
हा गोरखधंदा मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर दबक्या आवाजात येथील रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांनी बोलवून दाखविले. आपण वर्षभरापूर्वी आले असते तर हा प्रकार आधीच थांबविता आला असता, अशी कैफियतही त्या कर्मचाऱ्याने 'लोकमत'जवळ व्यक्त केली.
बाजूलाच जलसंपदा विभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात तर ओेल्या पार्ट्या करण्यात येत नाहीत ना ? अशी चर्चा आहे. 'लोकमत'ने हा प्रकार शनिवारी उजेडात आणला. या प्रकरणाची दखल येथील दोन्ही मुख्य अभियंता यांनी अद्यापही घेतली नाही.
येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी नियमित चौकीदार नसल्यामुळे या परिसरात कुणाचेही लक्ष राहत नाही. नेमका याच संधीचा फायदा हे मद्यपी घेतात. परिसरात दारू ढोसून खुलेआम दारुच्या पिऊन रिकाम्या बॉटल्स राजोरसपणे तेथेच फेकून देतात. त्यामुळे कार्यालयाच्या शिस्तीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. (प्रतिनिधी)
या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी
पाटबंधारे विभागाच्या कार्यालया जवळच कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. येथे शेकडो कुटुंब राहतात. या ठिकाणी मद्यपी खुलेआम दारु पिऊन या परिसरातच दारुच्या बॉटल्स फेकून देतात. येथे बाहेरील तरुणांचाही वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रात्री या परिसरारात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.