पहिल्या सभेसाठी ‘एके’ अन् ‘आरआय’ अध्यासी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:32+5:302021-02-06T04:20:32+5:30
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक बाकी असल्याने गावागावांतील वातावरण तापलेलेच आहे. आता ...

पहिल्या सभेसाठी ‘एके’ अन् ‘आरआय’ अध्यासी अधिकारी
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक बाकी असल्याने गावागावांतील वातावरण तापलेलेच आहे. आता ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यासाठी संबंधित ग्रामपंचायतींची पहिली सभा घेण्यात येईल. यासाठी अव्वल कारकून (एके) व मंडळ अधिकारी (आरआय) यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी काढले.
ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २ व ४ फेब्रुवारीला सर्व तालुक्यांमध्ये पार पडल्याने या पदाच्या आरक्षणाचा तिढा सुटला आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले व गावगाड्यात तडजोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. काही गावांत एका गटाला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य गटाजवळ असल्याने फोडाफोडीच्या राजकारणालाही सुरुवात झालेली आहे. यासाठी गावातील पदाधिकारीदेखील लक्ष देऊन आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व ३३ नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
बॉक्स
तालुकानिहाय निवडणूक तारीख
भातकुली तालुक्यात ११ ते १६ फेब्रुवारी, तिवसा व चांदूर रेल्वे ११ ते १५, मोर्शी व अंजनगाव सुर्जी ११ ते १६, धारणी ११ ते १७ तसेच अमरावती, चांदूर बाजार, चिखलदरा, वरूड, अचलपूर व दर्यापूर ११ ते १७, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होईल.
बॉक्स
राखीव उमेदवार नसल्यास या उमेदवारांना संधी
राखीव प्रवर्गात सरपंचपदाचा उमेदवार नसल्यास व व याच प्रवर्गातील सर्वसामान्य प्रभागातून निवडून आलेला उमेदवार सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. मात्र, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.