अजिंक्य गजाआड, ललित मोकळाच!
By Admin | Updated: December 27, 2014 22:43 IST2014-12-27T22:43:04+5:302014-12-27T22:43:04+5:30
तपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात

अजिंक्य गजाआड, ललित मोकळाच!
नियमसंगत कारवाईची अपेक्षा : अमरावतीच्या बाल कल्याण समितीकडे नजरा
गणेश देशमुख - अमरावती
तपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात नियमबाह््यरित्या वावरणारा, मुलींच्या कक्षात बिनदिक्कत प्रवेश करणारा, मुलीला मारहाण करणारा ललित अग्निहोत्री हा तरुण मात्र मोकळाच आहे.
तपोवनात लावण्यात आलेल्या तक्रारपेटीत अजिंक्यच्या कारनाम्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. तपोवनातील मुलींनी पोलिसांना दिलेल्या बयाण आणि तक्रारीवरून अजिंक्यविरुद्ध कारवाई करणे पोलिसांना नियमसंगत झाले.
जसा अजिंक्यचा बालगृहाशी कुठलाही संबंध नव्हता तसाच ललित अग्निहोत्री या तरुणाचाही बालगृहाशी कुठलाच संबंध नव्हता. त्रयस्थ असतानाही ललित बालगृहात नेहमीच त्याच्या इच्छेप्रमाणे प्रविष्ठ व्हायचा, वावरायचा. ललित बालगृहातील मुलींच्या खोलीत प्रवेश करायचा, अनेकवेळा अमानुष मारहाण करायचा. बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींना याबाबत विचारल्यास बहुतांश मुली ललितच्या या कृत्याची आजही कबुली देतात. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ काही मुलींनी अलीकडेच ललितच्या वागणुकीचे धक्कादाय किस्से कथन केलेत. वसतिगृहाचा तत्कालिन अधीक्षक गजानन चुटे याने देखील ललितचा नियमबाह्य प्रवेश आणि मारहाण याबाबतचा अधिकृत अहवाल सादर केलेला आहे. तपोवनातील मुलगी इतर महाविद्यालयातील वसतीगृहात असताना ललित त्या मुलीला भेटायला जात असल्याचा आणि मारहाण करीत असल्याचा उल्लेख अधिकृत दस्तऐवजांमध्ये आढळतो. खासगी महाविद्यालयाच्या अधिक्षेकेनेही याबाबत वक्तव्य केलेले आहे. नागपूरच्या बालकल्याण समितीने ललितच्या या वागणुकीविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचेही आदेशित केलेले आहे. त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. ललितची वागणूक गैरकायदेशीर होती, हे पुराव्यासकट सिद्ध होत असताना त्याला पाठिशी का घातले जाते, हा गुढ प्रश्न आहे.
अमरावतीच्या बालकल्याण समितीने तपोवनातील मुलींच्या सुरक्षेची चिंता वाहत त्यांना स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला. तो स्तुत्य आहे. ललित अग्निहोत्री या त्रयस्थ तरुणाच्या बेकायदा वागणुकीबाबतही अमरावतीच्या बालकल्याण समितीने कायदेसंगत निर्णय घेऊन नियमांचा आणि कायद्याचा आदर राखावा, अशी लोकभावना आहे.