आॅईल रस्त्यावर, ४० वाहनधारक जखमी
By Admin | Updated: July 12, 2015 00:16 IST2015-07-12T00:16:09+5:302015-07-12T00:16:09+5:30
परतवाडाहून अकोलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचे आॅईल पडल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी स्लिप होऊन ४० पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत.

आॅईल रस्त्यावर, ४० वाहनधारक जखमी
परतवाडा-अकोला मार्गावरील घटना : तीन तास सुरू होते अपघाताचे सत्र
अचलपूर : परतवाडाहून अकोलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचे आॅईल पडल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी स्लिप होऊन ४० पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. त्यामध्ये एका पिकअप व्हॅनचा समावेश आहे. शनिवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत अपघाताची ही मालिका सुरू होती.
परतवाडा-अकोला मार्गावरील सावळी ते हनवतखेडापर्यंत अज्ञात वाहनाचे आॅईल पडत गेले. शनिवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. परिणामी रस्त्यावर सांडलेले आॅईल रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले नाही. त्यातही कळस म्हणजे काळ्या रंगाचा रस्ता व आॅईल आणि पावसाला रिमझीम सुरुवात झाली होती. पावसामुळे घरी लगबगीने दुचाकीस्वार निघाले होते. परंतु अचानक जो-तो रस्त्यावर गाडी घसरून कोसळत होता. रस्त्यावर एकाक्षणी तर जवळपास १५ ते २० दुचाकीस्वार खाली पडल्याचे चित्र होते. प्रत्यक्षदर्शी असलेले मनसेचे राहुल कडू यांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले. दुचाकीसह एक पोल्ट्रीफार्मची पिकअप व्हॅनसुद्धा आॅईलमुळे रस्त्यावरून सरपटत जाऊन कडेला उलटली. (ता. प्रतिनिधी)
४० पेक्षा अधिक जखमी
जवळपास दोन तास चाललेल्या या घसरगुंडीमुळे ४० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर चित झाल्याचे चित्र होते. यात अनेकांचे कपडेसुद्धा आॅईलमुळे खराब झाले. जखमी कुठल्या दवाखान्यात आहेत याची माहिती घण्यात येत असल्याचे परतवाड्याचे ठाणेदार गिरीश बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.