विमानतळ, संत्रा उद्योग, मेडिकल कॉलेज, प्रशासकीय इमारती, विमविला भरभरून निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:48+5:302021-03-09T04:16:48+5:30
अमरावती : अलीकडच्या काही अर्थसंकल्पांमध्ये जिल्ह्याच्या पदरी फारसे काही पदरी नव्हते. यावेळी मात्र पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास ...

विमानतळ, संत्रा उद्योग, मेडिकल कॉलेज, प्रशासकीय इमारती, विमविला भरभरून निधी
अमरावती : अलीकडच्या काही अर्थसंकल्पांमध्ये जिल्ह्याच्या पदरी फारसे काही पदरी नव्हते. यावेळी मात्र पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास भरभरून निधी मिळाला आहे. यामध्ये बेलोरा विमानतळाचा विकास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे, मोझरी, कौंडण्यपूर विकास आरखडा, प्रशासकीत इमारतींचा कायापालट यांसह अन्य क्षेत्रांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली. हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी आहे. याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
ना. यशोमती ठाकूर यांनी या सर्व विकासात्मक कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांबाबत अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. अर्थसंकल्पात स्पष्ट तरतूद झाल्याने अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्णत्वास जाणार आहे.
वरूड-मोर्शीसाठी संत्रा प्रक्रिया केंद्रे
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी, वरूड तालुक्यांतील संत्राउत्पादकांसाठी अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रक्रिया उद्योगांअभावी संत्र्याची मागणीही घटली. पर्यायाने दर कोसळण्याची परिस्थिती उद्भवते. यामुळे संत्रा उत्पादकांची वाताहत होते. खासगी प्रकल्पांत शेतकऱ्यांना पुरेसा न्याय मिळत नाही. संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास पॅकिंग, व्हॅक्सिंग, विपणन आदी प्रकारांनादेखील वाव मिळणार आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्यामुळे संत्रा उत्पादकांना एकप्रकारे राजाश्रय मिळाल्याचे मानले जात आहे.
गुरुकुंज-मोझरी, कौंडण्यपूरसह लासूरसाठी विकास आराखडा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र गुरुकुंज-मोझरी येथील मूलभूत सुविधांसह आराखड्याद्वारे विकास होत आहे. यामधील प्रलंबित कामांसह काही कामे आता नव्यानेही सुरू करण्यात येतील. आदर्श ग्राम, स्वच्छतेसह गावागावांत एकोपा, अंधश्रद्धेवर प्रहार या सर्वांतून नागरिकांच्या विकासासाठी आता प्रयत्न होणार आहे.
प्राचीन विदर्भ राज्याची राजधानी व देवी रुक्मिणीसह पुराणातील पाच महासतींचे माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूरमध्ये पायाभूत सुविधा व प्रलंबित कामे आरखड्याद्वारे पूर्ण केली जाणार आहेत. येथे भेट देणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
शेकडो वर्षांचा वारसा लाभलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात १०१ कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यामधून आता दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांसह पर्यटनाचे दृष्टीने विकास केला जाणार आहे.
महिला व बालविकाससाठी भरीव तरतूद
महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या तीन टक्के नियतव्यय, राज्य राखीव पोलीस दलाचा पहिला स्वतंत्र महिला गट, तेजस्विनी योजनेत महानगरातील महिलांना प्रवासासाठी विशेष महिला बस, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेत गृहखरेदीची नोंदणी, घर कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरात सवलत, ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत मोफत एसटी प्रवासासाठी राज्यव्यापी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना आदी नानाविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. ना. यशोमती ठाकूर यांचे हे खाते असल्याने अधिकाधिक लोकाभिमुख योजना सुरू करण्यावर भर राहणार आहे.
कोट
सामाजिक न्याय, कामगार, आदिवासी विकास, बहुजन कल्याण आदी सर्वच विभागांसाठी व समाजातील वंचित घटकांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी शासनाने सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे. जिल्ह्यास विकासाची चालना देणारा देणारा हा अर्थसंकल्प आहे.
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री