लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावतीविमानतळाहून मुंबई विमानसेवेचा बुधवारी शुभारंभ झाला. दोन दिवसांपूर्वी याच कार्यक्रमासाठी वितरित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत अमरावती विमानतळाचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख असल्याचा उल्लेख अलायन्स एअर लाइन्सने करून खळबळ उडवून दिली होती, तर बुधवारी शुभारंभाच्या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये 'प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ' असे नाव दर्शविण्यात आले. यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी या दोन्ही चुका 'संबंधितां 'कडून झाल्याचा खुलासा करीत 'तो मी नव्हेच'च्या भूमिकेत आहे.
अलायन्स एअर लाइन्सने रविवारी पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून संभ्रम निर्माण केला होता. दरम्यान, यावरून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी खुलासा करीत निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या गैरसमजासाठी अलायन्स एअर लाइन्सला जबाबदार ठरविले बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदर्शित करण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये 'प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ' असे नाव दर्शविण्यात आले. अद्याप काहीही ठरले नसताना आणि अधिकृत घोषणा झालेली नसताना नाव झळकविण्याची ही चूक कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे सारवासारव करीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हात वर केले.
वास्तविक, ज्या कार्यक्रमासाठी कंपनी तथा स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली होती, त्याच कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना 'ती' दृकश्राव्य क्लिप कार्यक्रमापूर्वी बघण्याची, नजरेखालून घालण्याची सवड मिळू नये, याचेच आश्चर्य वाटते, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. त्या एजन्सीकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून, दोषीविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे एमएडीसीकडून सांगण्यात येत असले तरी अमरावती विमानतळ नामांतराच्या वादाला याच कंपनीने तोंड फोडले आहे.