संत्र्याला हवा २५ हजार हमीभाव
By Admin | Updated: October 12, 2015 00:27 IST2015-10-12T00:27:35+5:302015-10-12T00:27:35+5:30
वरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते.

संत्र्याला हवा २५ हजार हमीभाव
शासनाकडून घोर निराशा : संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
संजय खासबागे वरुड
वरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते. परंतु इतर पिकांप्रमाणे संत्र्याला हमीभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हैराण झाला आहे. त्यामुळे संत्र्याला देखील अन्य पिकांप्रमाणे प्रति टन २५ हजार रुपयप्रमाणे हमीभाव जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.
जिल्ह्यातील संत्र्याचे क्षेत्र ७० हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातून वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेतले जाते. वरूड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर. जमिनीवर आहे. दरवर्षी मृग बहाराचे संत्रा उत्पादन घेतले जात होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून सतत गारपिट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहारापेक्षा आंबिया बहाराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन घेतले जाते. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहाराचे तर दोन लाख टन मृग बहाराचे उत्पादन घेतले जाते.
७० टक्के आंबियाबहार घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करुन विकला जाणाऱ्या संत्र्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी? हा प्रश्न आहे.
संत्र्यापासून ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल करणारी आणि हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. परंतु राजाश्रया अभावी संत्रा उत्पादक परंतु पणन आणि प्रक्रिया नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागण्याची शक्यता आहे. राज्य, केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांकडून कृषी उत्पादनामध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी काही पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केले जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करुन वायनरी, रस प्रक्रिया केंद्र आदींसाठी संत्र्यांचा वापर केल्यास बहुगुणी संत्र्याला नक्कीच चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दिलेल्या आश्वासनामुळे संत्रा उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.