जुलैच्या पहिल्या आठवड्यात कृषिजागृती
By Admin | Updated: June 22, 2016 00:17 IST2016-06-22T00:17:25+5:302016-06-22T00:17:25+5:30
कृषिविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते ७ जुलैदरम्यान कृषिजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कृषिजागृती
अमरावती : कृषिविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते ७ जुलैदरम्यान कृषिजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. राज्यात कृषी विकासदरात वृद्धी करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधित केलेले अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात कृषी पथक जाईल. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान गाव खेड्यांपर्यंत जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाईल.
कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृृषी विज्ञान केंद्र, सर्व कृषी महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी पणन मंडळ, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका हे सर्व घटक यात सहभागी होतील.
शेतकरी मित्र, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कृषिजागृती सप्ताहात सहभाग करून घ्यावा, असे निर्देश कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कृषी सप्ताह साजरा करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे आहे. केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येणारे शेतकरी पूरक योजना गावात पोहोचविण्यास हा सप्ताह लाभकारी राहील.