पुन्हा एखादा ‘विजय’ हिरावू नये म्हणून...!
By Admin | Updated: November 18, 2015 00:15 IST2015-11-18T00:15:30+5:302015-11-18T00:15:30+5:30
‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे.

पुन्हा एखादा ‘विजय’ हिरावू नये म्हणून...!
नीता नकाशेंची कळकळ : न्यायासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार
अमरावती : ‘आमचे घर उद्ध्वस्त झालेय, मुलांचे पितृछत्र हरपलेय, आम्ही निराधार झालोय, आता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी जगायचे आहे. मात्र, ज्यांच्या अरेरावी आणि मुजोरीने सरांचा बळी घेतला, त्यांच्यावर जरब बसावी आणि यानंतर कोणत्याही शिक्षकाचा‘विजय नकाशे’ होऊ नये, यासाठी ‘त्या’ दोषी आमदारांसह सर्व अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी बांधिलकी मृत विजय नकाशे यांच्या पत्नी नीता नकाशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
नकाशे सरांच्या आत्महत्येचा प्रश्न राज्यस्तरावर गाजतो आहे. खासदार, आमदारांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली. मात्र, अद्यापही पीआरसीवर गुन्हा दाखल झालेला नाही. या पीआरसी सदस्यांवर गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी नीता नकाशे यांनी लावून धरली आहे. निर्दोष शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे काहीच वाकडे होऊ शकत नाही, असा संदेश या घटनेतून जायला नको, अशी कळकळ नीता नकाशे यांनी व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, आतापर्यंत नोकरीची गरज भासली नाही. मात्र, आता मुलांच्या भवितव्यासाठी नोकरी करावीच लागेल. तशी मानसिकता तयार केली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा, अशी आग्रही मागणीसुद्धा नीता नकाशे यांनी केली आहे. २००१ साली सून म्हणून नीता या नकाशे कुटुंबात आल्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर १४ वर्षीय विनित आणि १२ वर्षीय नवेन या दोन मुलांची जबाबदारी आली आहे.
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी पीआसीच्या धसक्याने नीता यांच्या पतीचा बळी घेतला.
‘तो’ निरोप शेवटचाच !
५ नोव्हेंबरला पीआरसी येणार म्हणून विजय नकाशे २ नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी सेमाडोहकडे रवाना झाले. त्या दिवशी पहाटे ६ वाजता नीता यांनी त्यांना शेगाव नाक्यावर सोडले. तीच त्यांची शेवटची भेट ठरली. सेमाडोहमध्ये मोबाईलला रेंज मिळत नसल्याने संपर्कही झाला नाही. त्यानंतर थेट ७ नोव्हेंबरला त्यांचे पार्थिवच पाहायला मिळाले. २ नोव्हेंबरपासून संवादच झाला नाही. सहाव्या दिवशी त्यांचे पार्थिवच समोर आल्याचे सांगताना नीता नकाशेंना अश्रू आवरत नव्हते.
पप्पा शाळेत गेलेत!
नकाशे दाम्पत्याची विनीत आणि नवेन ही दोन्ही मुले त्यांच्या पप्पांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ आहेत. पप्पा देवाघरी गेल्याची सुतराम कल्पना सुध्दा त्यांना नाही. पप्पा शाळेत गेलेत, शनिवारी संध्याकाळी परत येतील, असा त्यांना अद्यापही विश्वास आहे.