पुन्हा गुटख्याचा बाजार सुरू
By Admin | Updated: July 27, 2016 23:55 IST2016-07-27T23:55:11+5:302016-07-27T23:55:11+5:30
शहरात पुन्हा गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू झाली आहे. दोन आठवडयांपूर्वी महसूल विभागाने धाडसत्र राबवून कोेट्यवधी रूपयांचा गुटखा जप्त केला होेता.

पुन्हा गुटख्याचा बाजार सुरू
सहज होतोय उपलब्ध : नियमांचे उल्लंघन, एफडीएचे अधिकारी करतात तरी काय?
अमरावती : शहरात पुन्हा गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू झाली आहे. दोन आठवडयांपूर्वी महसूल विभागाने धाडसत्र राबवून कोेट्यवधी रूपयांचा गुटखा जप्त केला होेता. त्यामुळे अवैध गुटखाविक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. यानंतर जिल्ह्यात काही दिवस गुटखाबंदी होती. परंतु आता शहरात पुन्हा मोठया प्रमणात गुटखाविक्री सुरू झाली आहे. याकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष आहे.
एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांची याप्रकरणी आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी उचलबांगडी केली होती. त्यांची मुंबई येथे बदली केल्याने सहआयुक्तांना प्रभारी कारभार देण्यात आला आहे. वास्तविक त्यांच्याकडून गुटखाविक्रेत्यांवर धाडी टाकणे अपेक्षित होते. पण, तसे होताना दिसून येत नाही. पण, अंबानगरीतील गुटखाविक्रेत्यांना रोखण्यात एफडीएच्या अधिकाऱ्यांना अपयश येत आहे.
येथील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, नगर वाचनालय, जिल्हा परिषद जवळ अशा अनेक ठिकाणी अवैध गुटखा विकला जात आहे. त्यामुळे पुन्हा एफडीए अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून सर्वप्रथम एफडीएची पोलखोल केली होती. महसूल विभागाने व पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायद्याची अंमलबजाणी होईल असे वाटत होते, मात्र व्यर्थ!
अंबानगरीतील अवैध गुटखा विकणे केव्हा बंद होणार, असा सवाल विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने टाकलेल्या धाडीनंतर मोठा गुटखासाठा जप्त करुन तो नष्ट केल्याने अनेक गुटखाविक्रेत्यांनी या कारवाईची धास्ती घेतली होती. स्वत: जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीच ही कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. परंतु पंधरा दिवसांतच जैसे- थे परिस्थिती निर्माण झाली आहे. गुटखाविक्रीची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, हेच यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
एफडीएद्वारे सहा ठिकाणी कारवाई
मागील आठवड्यात ६ ठिकाणी कारवाई करुन गुटखा पकडल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी चार कारवाई अमरावतीत करण्यात आल्या तर दोन अचलपुरात करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एफडीएचे प्रभारी सहआयुक्त शशीकांत केकरे आल्यानंतर त्यांच्या आदेशान ही कारवाई करण्यात आली.
प्रत्येक पानटपरीवर गुटखा
सद्यस्थितीत आहे तरी कुठे गुटखाबंदी? असा प्रश्न विचारला जात असून अन्न व सुरक्षा मानके कायद्याची पायमल्ली केली जात आहे. जिल्हयात प्रत्येक पानटपरीवर गुटख्यांच्या पुड्या व सुगंधी तंबाखू सहज उपल्ब्ध होत असल्याने सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. एफडीएच्या प्रभारी सहआयुक्तंकडून कारवाईची अपेक्षा आहे. पण, त्यांनीही या विषयावर मौन ठेवले आहे.