अडीच दशकानंतर अमरावती पंचायत समितीवर काँग्रेसची बाजी
By Admin | Updated: March 15, 2017 00:02 IST2017-03-15T00:02:01+5:302017-03-15T00:02:01+5:30
भाजपची जोरदार लाट अमरावती शहरात थोपविण्यात आ.यशोमती ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा एकदा यशस्वी ठरला.

अडीच दशकानंतर अमरावती पंचायत समितीवर काँग्रेसची बाजी
भाजपची थोपविली लाट : यशोमती ठाकुरांचा करिश्मा
अमरावती : भाजपची जोरदार लाट अमरावती शहरात थोपविण्यात आ.यशोमती ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा एकदा यशस्वी ठरला. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती पंचायत समितीवर तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला सन्मानपूर्वक विराजमान करण्यात आ. यशोमतींचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच जिल्ह्यात काँग्रेसचा हा विजय लक्ष्यवेधी ठरला आहे.
महानगराशी संलग्न अमरावती पंचायत समितीमध्ये भाजपची लाट थोपविण्यात आ. यशोमती ठाकूर यांना मिळालेले देदीप्यमान यश अधोरेखित करण्यासारखेच आहे. शहरात चौफेर उधळलेल्या भाजपच्या वारूला जिल्हा मुख्यालयाच्या पंचायत समितीत लगाम घातला गेला, तो यशोमतींमुळेच. पंचायत समिती निवडणुकीत पाच सदस्य निवडून आलेत तर मंगळवारी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेसह प्रहारच्या प्रत्येकी एका सदस्याने पाठिंबा दिल्याने १० सदस्यांच्या सभागृहात कॉँग्रेसचे सात संख्याबळ झाले आहे.
आ. यशोमती ठाकूर याचा दांडगा जनसंपर्क, आश्वासनांना प्रत्यक्ष कृतीची जोड यामुळे तिवसा मतदारसंघात जिल्हा परिषद गटांमध्ये ७ सदस्य निवडून आले होते तर अमरावती पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने २५ वर्षानंतर इतिहास घडविला आहे. आ. ठाकूर यांच्या झंझावाताने पुन्हा एकदा कॉँग्रेसचे येथे वर्चस्व निर्माण झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
धर्मनिरपेक्ष राजकारणाची मोहोर
अमरावती पंचायत समिती सभापतीपदासाठी अल्पसंख्यक समाजाच्या वहिदाबी युसुफ शहा यांना उमेदवारी देऊन त्यांना बहुमताने निवडून आणित आमदार यशोमती ठाकूर यांनी धर्मनिरपेक्ष राजकारण पुन्हा एकदा अधोरेखित केले व हीच कॉँग्रेसची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी दोन सदस्यांचा कॉँग्रेसला पाठिंबा
सभापती, उपसभापतीपदासाठी कॉँग्रेसला सात मते मिळाली. बाळासाहेब देशमुख उपसभापती विजयी झालेत. सेना, प्रहारच्या प्रत्येकी एका सदस्याने पाठिंबा दिल्याने विरोधी उमेदवाराला भाजपाचे एक व युवा स्वाभिमानची दोन मते मिळालीत.
सर्वांचेच परिश्रम फळाला आले. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या पंचायत समितीवर मागील२५ वर्षांनंतर कॉँग्रेसने बाजी मारली. याचा मनस्वी आनंद आहे.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा