सहा महिन्यांनंतर प्रशासकांकडून कारभार सरपंचांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:25+5:302021-03-17T04:14:25+5:30

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० पैकी मुदत संपलेल्या ५५२ ग्रामपंचायतींवर गत सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ...

After six months, from administrator to caretaker sarpanch | सहा महिन्यांनंतर प्रशासकांकडून कारभार सरपंचांकडे

सहा महिन्यांनंतर प्रशासकांकडून कारभार सरपंचांकडे

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० पैकी मुदत संपलेल्या ५५२ ग्रामपंचायतींवर गत सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास २१७ प्रशासक नेमले होते. या प्रशासकांनी जवळपास सहा महिने कारभार सांभाळल्यानंतर आता सरपंचांकडे ग्रामपंचायती सुपूर्द केल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे एप्रिल ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी गावातील ज्येष्ठ नागरिकांची नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागणार होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले. या प्रशासकांच्या हाती ग्रामपंचायतींचा कारभार असल्यामुळे राजकीय लुडबुड थांबली. परिणामी गावच्या पुढाऱ्यांचाही हिरमोड झाला. आता प्रशासकांकडील कारभार सरपंचाच्या हातात आला आहे. गावागावांतील विकासकामे हाताळण्याचा तसेच नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सरपंचाकडे दररोज ग्रामस्थ अडीअडचणी मांडण्यासाठी येत असल्याचे चित्र ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये दिसून येत आहे.

बॉक्स

असे होते तालुकानिहाय प्रशासक

तालुका ग्रा.प.संख्या प्रशासक संख्या

अमरावती ४६ १९

भातकुली ३६ १२

नांदगाव खं ५१ १९

चांदूर रेल्वे २९ १४

धामणगाव रेल्वे ५५ १८

तिवसा २९ १७

मोर्शी ३९ १५

वरूड ४१ १५

चांदूर बाजार ४१ १४

अचलपूर ४३ १९

अंजनगाव सुर्जी ३४ ११

दर्यापूर ५० २०

चिखलदरा २३ ११

धारणी ३५ १३

एकूृण ५५२ २१७

कोट

कोरोनामुळे निवडणूक लांबल्याने ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे सोपविला होता. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार असल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतींशी संबंधित कामे वेळेवर होऊ शकत नव्हती. सरपंच निवडल्या गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

- विपीन अनोकार, सरपंच, निमखेड बाजार

Web Title: After six months, from administrator to caretaker sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.