सहा दिवसांनी मिळते पॉझिटिव्ह असल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:30+5:302021-03-10T04:14:30+5:30

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना चाचणीकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान ...

After six days, the information is positive | सहा दिवसांनी मिळते पॉझिटिव्ह असल्याची माहिती

सहा दिवसांनी मिळते पॉझिटिव्ह असल्याची माहिती

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना चाचणीकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान सहा ते सात दिवस लागत आहेत. तोवर या पॉझिटिव्हचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कसा रोखणार कोरोना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काही रुग्ण अँटिजेन चाचणीच्या आधारे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले व उपचारानंतर सहा दिवसांनी त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला. त्यानंतर तुम्ही आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे फोनद्वारे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींनी जर ॲन्टिजेन चाचणी केली नसती, तर त्याला पॉझिटिव्ह आहे, हे माहिती व्हायला सहा ते सात दिवस लागले असते व त्याचे संसर्गातून कित्येक जण बाधित झाले असते.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. १ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत १८,००७ रुग्णांची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार, तर महापालिका क्षेत्रात २६ हजारांच्या घरात आहे. आता अमरावती शहरच आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाचे गाईड लाईननुसार येथे पुरेशा तरतुदी लागू केलेल्या नाहीत. शहरात साईनगर, राजापेठ, दस्तुरनगर, अर्जुननगर आदी भाग कोरोनाचे हॉट स्पॅाट बनले आहेत. याशिवाय ग्रामीणमध्ये अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतीच आहे. या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायला पाहिजे. मात्र, अलीकडे या प्रकाराचा विसर आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

बॉक्स

मोबाईलवर मिळणार पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा मेसेज, जिल्हाधिकारी

विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ या आठवड्यात झालेली आहे. त्यामुळे रोज १,६०० वर नमुन्यांची तपासणी होते. आता तर चार शिफ्टमध्ये काम होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची होईल. साधारणपणे तिसरे दिवशी अहवालाविषयी माहिती व्हायला पाहिजे. आता स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पॅाझिटिव्ह, निगेटिव्ह याची दोन दिवसांत माहिती देणारा मेसेज मिळणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असे मेसेज जातील, याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. एका संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला दिली.

बॉक्स

स्वॅब दिल्यानंतरची प्रक्रिया

संशयित रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याला साधारणपणे उणे २५ या तापमानात ठेवण्यात येते व त्यानंतर सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. या ठिकाणी मशीनमध्ये एका वेळी किमान २०० नमुन्यांची तपासणी होते व या प्रक्रियेला चार तास लागतात. येथून रिपोर्ट सीएस कार्यालयास व तेथून डीएचओ व एमओएच यांच्याकडे जातात आणि नंतर संबंधित व्यक्तीला फोन करून पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे सांगितले जाते.

बॉक्स

येथे होते दिरंगाई

स्वॅब सेंटरमधील नमुने पुरेसे ‘फ्रोजन आईस पॅक’ झाले नसतील तर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवूण दुसरे दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. लॅबमध्येही अगोदरचे प्रलंबित नमुने मशीनवर लावले गेले असतील तर थोडा उशीर होतो. लॅबद्वारा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आरोग्य यंत्रणेद्वाराही फोन करण्यास पुढचा दिवस निघतो. रुग्णसंख्या जास्त असल्यास प्रत्येक प्रक्रियेमध्ये विलंब होतो.

पाईंटर

दिनांक नमुने तपासणी पॉझिटिव्ह

१ मार्च २,१९६ ६९९

२ मार्च २,२७६ ६३६

३ मार्च २,४९६ ६७१

४ मार्च २,६९४ ६७३

५ मार्च २,५६६ ६५१

६ मार्च २,८२३ ६३१

७ मार्च २,२३२ ४४६

८ मार्च १,९५६ ४६२

Web Title: After six days, the information is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.