जिल्हा परिषद नोकर भरतीत तोंडी परीक्षा बाद
By Admin | Updated: September 4, 2014 23:28 IST2014-09-04T23:28:14+5:302014-09-04T23:28:14+5:30
जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया

जिल्हा परिषद नोकर भरतीत तोंडी परीक्षा बाद
शासन निर्णय : गैरप्रकाराला आळा बसणार
अमरावती : जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने तयारी करून वरील पदाकरिता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय नोकर भरतीत होणाऱ्या गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ आॅक्टोबर २००७ रोजी भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ मधील लिपीकवर्गीय पदांकरीता मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय २६ डिसेंबर २०११ ला सुद्धा शासनाने गट ‘क’ वर्गातील पदभरतीसाठी वरीलप्रमाणे निकष वापरण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या होत्या. याच शासन निर्णयात शासनाने दुरूस्ती करीत ५ जून २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात गट ‘क’ आणि गट ‘ब’ अराजपत्रीत मधील कुठल्याही पदाकरिता उमेदवारांची निवड करताना मौखीक परीक्षा मुलाखती घेऊ नये असे स्पष्टेपणे नमूद केले आहे. त्याऐवजी या पदांकरिता उमेदवार निवडताना त्यांची २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी त्या परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे निवड सुची तयार करून त्यांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा आणि ८० गुणांची व्यावसायिक चाचणी अशी गुण विभागणी करावी. सुतार, गवंडी, वाहन चालक अशा शालांत परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी ६० गुणांची व्यावसायिक, चाचणी आणि ४० गुणाची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करावी. ज्या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणीची गरज नाही अशा पदांसाठी शंभर गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करावी असे शासनाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद नोकरभरतीत मौखीक परीक्षा घेतली जाणार नाही. (प्रतिनिधी)