एका तपानंतर बाजार समितीवर भारसाकळेंना मिळाली सत्ता स्थापनेची संधी
By Admin | Updated: September 4, 2015 00:30 IST2015-09-04T00:30:20+5:302015-09-04T00:30:20+5:30
तब्बल वीस वर्षे दर्यापूर मतदार संघाचे नेतृत्त्व करणारे तसेच आकोटचे विद्यमान आ. प्रकाश पाटील भारसाकळे यांनी दर्यापूरच्या राजकारणावर नेहमीच पकड ठेवली आहे.

एका तपानंतर बाजार समितीवर भारसाकळेंना मिळाली सत्ता स्थापनेची संधी
राजकीय हालचालींना वेग : विरोधकांना ईश्वरचिठ्ठीचे वेध
संदीप मानकर दर्यापूर
तब्बल वीस वर्षे दर्यापूर मतदार संघाचे नेतृत्त्व करणारे तसेच आकोटचे विद्यमान आ. प्रकाश पाटील भारसाकळे यांनी दर्यापूरच्या राजकारणावर नेहमीच पकड ठेवली आहे. त्यांच्या नेतृत्वात दर्यापूर विधानसभा मतदार संघाला आमदार रमेश बुंदीले यांच्या रुपात नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे त्यांची पुर्वीसारखीच दर्यापूर मतदार संघाच्या सहकार क्षेत्रावरही पकड कायम असल्याचे नुकत्याच झालेल्या दर्यापूर व अंजनगाव बाजार समिती निवडणुकीच्या निकालाने सिध्द केले आहे. परंतु आमदार भारसाकळे यांना एका तपानंतर बाजार समितीवर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली आहे, हे विशेष.
आमदार भारसाकळे यांच्या शेतकरी पॅनेलने बाजारसमितीमध्ये १५ पैकी ८ जागा जिंकून बाजी मारली. तर याच निवडणुकीत त्यांचे बंधु जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अचानकपणे वेगळी चूल मांडून सहकार पॅनलचे नेतृत्व केले. यांच्या पॅनलला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत जरी यश मिळाले असले मात्र बाजार समितीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे. त्यांना चार जागा जिंकता आल्या तर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत किसान पॅनलचा सफाया झाला. परंतु बाजार समितीत मात्र किसान पॅनलला तीन जागा जिंकता आल्यात. किसान पॅनलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती अरुण पाटील गावंडे यांनी केले. तर समितीचे माजी सभापती बाळासाहेब वानखडे यांच्या समता पॅनलला खातेही उघडता आले नाही. याच पॅनलचे माजी सभापती राहिलेले बाळासाहेब वानखडे व मदन पाटील बायस्कार हे दोनही दिग्गज पराभूत झाले आहे. तर अरविंद नळकांडे यांच्या सोकारी पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले.
२००० साली आमदार भारसाकळे यांच्या पॅनलची बाजार समितीत सत्ता होती. त्यावेळेस मदन पाटील बायस्कार हे सभापती होते. तर उपसभापती बाळासाहेब राऊत होते. परंतु या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर २००५ मध्ये माजी सभापती अरुण पाटील गावंडे हे सभापती तर उपसभापतीपदी बाळासाहेब वानखडे विराजमान झाले होते. तर २००९ मध्ये अरुण पाटलाला धक्का देत बाळासाहेब वानखडे यांच्या पॅनलने सत्ता काबीज केली होती. यामध्ये बाळासाहेब वानखडे सभापती झाले तर उपसभापतीची माळ साहेबराव भदे यांच्या गळ्यात पडली होती. परंतु या निवडणुकीत माजी उपसभापती साहेबराव भदे यांनी सहकार पॅनेलच्यावतीने निवडणूक लढत जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सत्ता काबीज करण्यासाठी आमदार भारसाकळे यांच्याकडे आठ जागा आहेत. त्यांनासत्ता काबीज करण्यासाठी दोन संचालकांची आवश्यकता आहे. अडते व व्यापारी मतदार संघातून निवडून आलेले दोन संचालक व हमाल व तोलारी मतदार संघातून निवडून आलेले एक संचालक या तीनही उमेदवारांनी आतापर्यंत परिस्थितीनुसार ज्या पॅनेलला जास्त जागा त्या पॅनेलच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. सहकार पॅनेल व किसान पॅनेल यांनी युती केली तर त्यांचे संख्याबळ सात होते. त्यांनाही ईश्वर चिठ्ठीसाठी दोन संचालकाची तर पॅनेल बसविण्यासाठी तीन संचालकांची गरज आहे. परंतु अडते व व्यापारी यांच्यामधुन निवडून आलेले एक संचालक शेतकरी पॅनेलच्या गोटातील असल्यामुळे शेतकरी पॅनेलचे संख्याबळ नऊ झाले आहे. खरेदी विक्रीच्या अपयशानंतर बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळी राजकीय खेळी करुन आमदार भारसाकळे यांनी ऐतिहासीक यश मिळविले. त्यामुळे बाजार समितीत ते एक हाती सत्ता काबीज करतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तसे झाल्यास एक तपानंतर भारसाकळे यांची सत्ता स्थापन होईल. सभापतीपदाच्या निवडणुकीला एक महिन्याचा अवधी आहे.