निकालानंतर बदली अन् भरतीही!
By Admin | Updated: May 11, 2014 22:51 IST2014-05-11T22:51:56+5:302014-05-11T22:51:56+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत.

निकालानंतर बदली अन् भरतीही!
अमरावती : लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेतही १७ मे पासून वर्ग तीन आणि चार मधील कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. याशिवाय पुढील महिन्यात अमरावतीसह अन्य ठिकाणी पोलीस भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशासकीय सेवेतील अनेक बड्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. पोलिसांच्या बदल्यांबाबत बदल्याचे गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलातील कर्मचार्यांच्या बदल्यांचे निकष गृह विभागाने बदलले आहेत. यामुळे कर्मचार्यांसोबतच आस्थापना विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. ३० टक्के पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करावयाच्या असल्याने हा गोंधळ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पोलीस कर्मचार्यांच्या दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल्या होतात. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बदल्याचे गॅझेट प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)