‘ब्रेकअप’नंतर स्थानिक कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:08:15+5:302014-09-27T23:08:15+5:30
महायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे.

‘ब्रेकअप’नंतर स्थानिक कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’
गजानन मोहोड - अमरावती
महायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे. मात्र, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव वधारले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पितृपक्ष संपल्यानंतर २५ सप्टेंबर म्हणजे घटस्थापनेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. याच दिवशी सायंकाळी महायुती व आघाडी यांच्यामधील युती फिस्कटली. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांचे स्वतंत्र उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. धक्कादायक घडामोडीनंतर जिल्ह्याचे समीकरण रातोरात बदलले. इच्छुक उमेदवारांच्या पक्षनिष्ठा बदलल्या, नेत्यांनी पक्षबदल केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली. उमेदवारांनाही नवीन घरठाव केलेल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. ज्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून दोन दशक काम केले त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. तूर्तास काही पदाधिकाऱ्यांनी घरी बसणे पसंत केले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमा करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव मात्र वधारले आहेत. राजकारणातल्या या धक्कादायक तंत्रानंतर कार्यकर्त्यांची चंगळ सुरू झाली आहे. एरवी कार्यकर्त्यांची, सहकाऱ्यांची आठवण न करणाऱ्या राजकीय मंडळींना आता सर्वांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाइंसह सर्वच पक्षांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.