अखेर शेख जफर फरार घोषित
By Admin | Updated: December 18, 2014 00:07 IST2014-12-18T00:07:26+5:302014-12-18T00:07:26+5:30
चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख जफर शेख जब्बार याला न्यायालयाने फरार घोषित केले.

अखेर शेख जफर फरार घोषित
अमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख जफर शेख जब्बार याला न्यायालयाने फरार घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी रात्री शेखर रमेश आठवले (२२, रा. महाजनपुरा) या आरोपीला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख जफरचा जाहीरनामा निघाला असून ती प्रत जफरच्या घरावर लावण्यात आली आहेत. एक महिन्याच्या आत शेख जफर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती पोलीस जप्त करणार आहे.
अटकपूर्व जामिनासाठी धडपड
चांदणी चौकात गोळीबार झाला होता. २० दिवस होऊनही मुख्य सूत्रधार शेख जफर फरार आहे. गुन्हे शाखेचे पथक शेख जफरच्या शोधात अकोला, वर्धा, मूर्तीजापूर, यवतमाळ, नागपूरसह विविध ठिकाणी शोध घेत आहे. मात्र शेख जफरचा सुगावा लागला नाही. त्यामुळे शेख जफर महाराष्ट्राबाहेर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच मंगळवारी न्यायालयाने शेख जफरला फरार घोषित केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शेख जफरचा जाहीरनामा निघाल्याने आता त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला १ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. शेख जफर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. मंगळवारी अटक आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.