१० तासानंतर सुटले प्रहारचे आंदोलन
By Admin | Updated: April 2, 2016 00:13 IST2016-04-02T00:13:36+5:302016-04-02T00:13:36+5:30
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ़बच्चू कडू यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पाचशे फुट अंतरावरील ...

१० तासानंतर सुटले प्रहारचे आंदोलन
एसडीओंची मध्यस्थी : अखेर तरूण उतरले टॉवरवरून खाली
धामणगाव रेल्वे : प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ़बच्चू कडू यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पाचशे फुट अंतरावरील टॉवरवर चढलेल्या तीन्ही युवकांनी तब्बल १० तास आंदोलन केले़ दरम्यान एसडीओ व्यवहारे यांच्या मध्यस्थीने रात्री एक वाजता आंदोलन मागे घेण्यात आले़
आ़ बच्चू कडू यांना अटक करून गुन्हे दाखल केल्याप्रकरणी गुरूवारी दुपारी चार वाजता शहरातील बीएसएनएलच्या टॉवरवर प्रहारचे तालुकाध्यक्ष अजय ठाकरे, विजय भगत, तेजस धुर्वे हे तिन्ही युवक चढले होते. याच टॉवरखाली प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांच्यासह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली़ तालुका प्रशासनाने विनंती करूनही हे आंदोलन तब्बल दहा तास चालले.
रात्री एक वाजता चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे आल्यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष हेेंडवे यांच्याशी चर्चा केली आणि सदर आंदोलन मागे घेण्यात आले़ त्यानंतर तीनही युवक टॉवरवरून खाली उतरले. आंदोलनात मध्यस्थी करावी, याकरीता तहसीलदार श्रीकांत घुगे, दत्तापूरचे दुय्यम ठाणेदार प्रशांत कावरे व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता़ (तालुका प्रतिनिधी)