‘एनआरएचएम’ला सामावून घ्या
By Admin | Updated: October 14, 2016 00:56 IST2016-10-14T00:56:48+5:302016-10-14T00:56:48+5:30
राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे.

‘एनआरएचएम’ला सामावून घ्या
संजय खोडके : धरणे आंदोलनाला भेट, समस्या जाणल्यात
अमरावती : राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. त्याकरिता नवीन पदभरती किंवा मान्यतेची गरज नसल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी गुरुवारी येथे दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने येत्या वर्षात सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलन स्थळी भेट देताना संजय खोडके मार्गदर्शन करताना बोलत होते. खोडके यांनी केंद्र सरकारने सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान सुरू केले होते. शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी मूलभूत असल्याचे केंद्रस्थानी गृहित धरून हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र आघाडी सरकार पायउतार होताच भाजप सरकारने हे दोन्ही उपक्रम गुंडाळण्याचा घाट रचल्याचा आरोप काँग्रेसचे संजय खोडके यांनी केला. राज्यात एनआरएचएमचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य विभागात विविध पदे रिक्त असून त्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. पंरतु राज्य शासन आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकाच्या मोर्चात लाठीमार करून त्यांना सळो की पळो करून सोडले. यात काहींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. अन्यायाविरुद्ध लढा उभारू नये, अशी भूमिका शासनाची असून एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्यायसाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागेल, असेही खोडके म्हणाले. यावेळी बंड्या साने, प्रशांत जोशी, रुपेश सरदार, प्रफुल्ल रिदोरे, अभिषेक जिरापुरे, किशोर माहुरे, सोनाली बारबुद्धे, शशीकांत तभाने, विनोद मकेश्वर, रतन छापानी, निलेश देवीकर, पंकज औरंगपुरे, महेंद्र अंबुलकर, पी.एस. झांबडे, राजू जांगजोड, दीपक सहारे, प्रसाद अनासाने उपस्थित होते.